धुळे । दि.17 । प्रतिनिधी Dhule

शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे मंगल कार्यालयात उपस्थिती असणे गरजेचे आहे. तसे न आढळल्यास मंगल कार्यालय सील करण्यात येईल. व विना मास्क फिरणार्यांवर कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक आज दि.17 फेब्रुवारी रोजी आयुक्त अजिज शेख यांनी तातडीने घेतली. कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेवून शहरात व जिल्ह्यात दक्षता व काळजी घेवून उपाययोजना करावेत. असे निर्देेश आयुक्तांनी या बैठकीत दिले.

शहरातील सर्व मंगल कार्यालयाची पाहणी करुन दोषी आढळल्यास त्यांना नोटीस द्यावी व दंडात्मक कारवाई करावी तसेच विना मास्क व निर्धारीत संख्येपेक्षा जास्त नागरिक आढळल्यास त्यांच्यावर कार्यवाही करुन पहिल्या टप्यात नोटीस देऊन दंडात्मक कारवाई करावी व दुसर्या टप्प्यात दक्षता न घेतल्यास त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी व सदर मंगल कार्यालय पंधरा दिवसासाठी सील करण्यात यावे. तसेच शहरातील खाजगी शिकवणी क्लासेस व कोचिंग क्लासेस यांची पाहणी करून तेथील विद्यार्थी व परिसराची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

यात विद्यार्थ्यांनी मास्क लावणे, सोशल डिस्टसिंग, सॅनिटायझेशन याबाबत पाहणी करावी व त्यासंदर्भात संबंधित संस्थाचालकांना नोटीस देण्यात यावी तसेच याबाबत आवश्यक ती कारवाई न झाल्यास दंडात्मक कारवाई व कोचिंग क्लासेस सील करण्याबाबत असे बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत. तसेच यासाठी स्वच्छता निरीक्षक व वसुली निरीक्षकांमार्फत त्यांच्या प्रभागातील मंगल कार्यालयाची पाहणी व तपासणी करण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

शहरातील गर्दीच्या ठिकाणी विना मास्क फिरणार्यांवर नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. शहरातील खाजगी दवाखान्यांमध्ये फ्ल्यू अथवा तत्सम आजाराने दाखल होणार्या रुग्णांची तातडीने तपासणी करणे गरजेचे असल्याने खाजगी दवाखान्यांना यासंदर्भात नोटीस देण्यात यावी.

सर्दी, फ्ल्यू व तत्सम आजारांनी बाधित असलेल्या रुग्णांनी कोविड टेस्ट करून घेणे गरजेचे असून सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणे धोकेदायक आहे. अशी व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर आपत्कालीन कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच भाजी मंडई, शहरातील मुख्य बाजारपेठा, मोठे संस्थाचालक, दुकानदार यांची रॅपिड टेस्ट करणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची संख्या वाढविण्याबाबत निर्णय बैठकीत घेण्यात आला.

ही कारवाई मनपा व पोलीस विभागाच्या संयुक्त माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच पुढील काळात आवश्यकता असल्यास विलगीकरण कक्ष कार्यन्वित करण्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री कर्मचारी, वैद्यकीय पथकाची नियुक्ती, व्हेंटिलेटरची आवश्यकता याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

नागरिकांनी सहकार्य करावे अन्यथा पुनश्च कडक स्वरूपाचा लॉकडाऊन केला जाईल असा इशाराही या बैठकीत देण्यात आला आहे.