मराठा समाजाच्या भितीनेच लॉकडाऊन

आ. नितेश राणे यांचा आरोप; आरक्षणासाठी आता आक्रमक भुमिकेची गरज
मराठा समाजाच्या भितीनेच लॉकडाऊन

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

राज्यातील महाविकास आघाडी सरकार चुकीची माहिती देवून मराठा समाजाला फसवत आहे. सरकारने मराठा आरक्षणाचा नियोजित पध्दतीने खून केला असल्याची टिका भाजपाचे आ. नितेश राणे यांनी केली.

हे सरकार असे पर्यंत कुठल्याही समाजाला न्याय मिळू शकणार नाही. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी आक्रमक भुमिका घेण्याची गरज आहे. राज्यात पुढील पंधरा दिवसांचा लॉकडाऊन हा केवळ मराठा समाजाच्या भितीनेच केला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

खा. डॉ. सुभाष भामरे यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खा. डॉ. सुभाष भामरे, माजीमंत्री आ. जयकुमार रावल, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, मनपा स्थायी समितीचे सभापती संजय जाधव, नगरसेवक शितल नवले आदी उपस्थित होते.

यावेळी आ. राणे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला गाडण्याचे काम केले आहे. 2014 मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौव्हाण यांनी राणे समिती गठीत केली. या समितीने राज्याचा सर्व्हे करून समाज मागासलेला असून तामीळनाडु राज्यातील आरक्षणाचा अभ्यास करून राज्यात पहिल्यांदा आरक्षण लागू झाले.

त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन करून मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवून दाखविले. मराठा समाज कसा मागासलेला हे गायकवाड समितीने अहवालातून दाखविले.

मात्र महाविकास आघाडी सरकारने गायकवाड समितीच्या अहवालातील मुद्देच व्यवस्थीत मांडले नाही. वास्तविक गायकवाड समितीने मराठा समाज हा 90 टक्के शेती करणारा समाज आहे, हे अहवालात स्पष्ट नमुद केले होते. मात्र या सरकारने वकीलांसोबत पाठपुरावा केला नाही. त्यामुळे न्यायालयात आरक्षण टिकले नाही, असा आरोपही आ. राणे यांनी केला.

हे सरकार असे पर्यंत कुठल्याही समाजाला न्याय देवू शकत नाही, हे सिध्द झाले आहे. काहीही झाले तरी हे सरकार केंद्राकडे बोट दाखविते. ठरविले तर आजही हे सरकार आरक्षण देवू शकते. ते कसे मी सांगु शकतो. त्यासाठी कोणालाही माझ्यासमोर बसवा, मी चर्चा करायला तयार आहे, असे आव्हानही आ. राणे यांनी दिले.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र तरीही केवळ मराठा समाजाच्या भितीनेच पंधरा दिवस लॉकडाऊन वाढविण्यात आला आला. कारण मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मंत्री रस्त्यावर फिरू शकणार नाही. शंभर कोटी जमा करायला हे सरकार हात आखडता घेत नाही. मात्र आरक्षण देतांना घेतात, अशी टिकाही त्यांनी केली.

छत्रपती संभाजीराजे आमच्या सोबत आहेत. या सरकारशी संवाद साधु नका, बोलून नका. सहा तारखेचीही वेळही पाळु नका, असे मी राजेंना सांगेल, असेही आ. राणे यावेळी म्हणाले. आम्ही मराठा समाजासोबतच आहे. त्यासाठी कोणाशीही लढा द्यायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर लवकरच आरक्षण मिळेल

मराठा समाजाचे आमदार शांत का, असा प्रश्न आम्हालाही पडला आहे. सरकारमधील मराठा समाजाचे मंत्री, आमदारांनी आरक्षणासाठी एकत्र यावे. त्यांनी एकाच वेळी राजीनामा जरी दिला तर लवकरच आरक्षण मिळेल, असेही आ. नितेश राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com