हळदीच्या दिवशीच नवरदेवाने घेतला गळफास

कापडणेतील घटना, ग्रामस्थांमधून हळहळ
हळदीच्या दिवशीच नवरदेवाने घेतला गळफास

कापडणे - Kapadane - प्रतिनिधी :

येथील खाज्या नाईक नगर या धनूरलगत असलेल्या भागातील आकाश कांतीलाल भिल या तरुणाने आपल्या हळदीच्या दिवशीच शेतात जाऊन आज (दि.14) गळफास घेतला.

याबाबत सोनगीर पोलिसात नोंद झाली असून घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

येथील खाज्या नाईक नगरमधील कांतीलाल भिल यांच्या दोन्ही मुलांचे लग्न एकाच मांडवात धनूर येथे दि. 15 रोजी होणार होते.

मात्र त्यापूर्वीच हळदीच्या दिवशी आज (दि. 14) सकाळी शौचास गेलेल्या आकाश कांतीलाल भिल या 24 वर्षीय नवरदेवाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

कुटूंबात एकीकडे लग्नाची धामधूम सुरू होती. दि. 13 रोजी लग्न कार्याला जेवणासाठी लागणारी बुंदी पाडण्याचा कार्यक्रम देखील पार पडला होता.

मात्र दि. 14 रोजी नवरदेव आकाश भिल हा सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शौचास जाऊन येतो म्हणून घरून निघाला. भात नदीच्या पलीकडे गेल्यावर एका शेतात लिंबाच्या झाडाला आकाशने गळफास घेतल्याचे आढळून आले.

आकाश भिल हा कुटूंबातील शिक्षित मुलगा होता. तो धुळे शहरानजीक असलेल्या गोंदूर येथील एका कॉलेजला बीएससीचे शिक्षण घेत होता. आकाश भिल याने हळदीच्या दिवशीच असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत समजू शकले नाही. सोनगीर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com