मुलाचे श्राद्ध घालण्याआधीच बापाचीही आत्महत्या

मुलाचे श्राद्ध घालण्याआधीच बापाचीही आत्महत्या

कापडणे - Kapdane - रामकृष्ण पाटील :

आत्महत्याग्रस्त मुलाचे वर्षश्राध्दही झाले नाही, त्याआधीच बापानेही आत्महत्या केल्याची दुःखदायक घटना कापडणे गावात घडली.

येथील हिंमत किसन माळी (वय 55) या शेतकर्‍याने कर्जबाजारीपणास कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. डोक्यावर असलेल्या कर्जाच्या बोझ्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते अस्वस्थ होते. अकरा महिन्यांपूर्वीच त्यांचा मोठा मुलगा विलास माळी यानेही कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती.

विलास माळी याच्या शेतकरी आत्महत्येची शासकीय मदतही अजुन मिळालेली नाही. वर्षभरातच बापलेकांनी आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

येथील महादेव वाडीत राहणारे हिंमत किसन माळी (वय 55) यांनी आज (दि.11) सकाळी सहा वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबातील इतर व्यक्ती खालच्या घरात असतांना हिंमत माळी यांनी आत्महत्या केली.

मुलगा भागवत माळी हा वडिलांना बघण्यासाठी वरच्या खोलीत गेला असता त्यास वडीलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. हे दृष्य पाहताच मुलाने हंबरडा फोडला. मृत हिंमत माळी यांच्यावर राष्ट्रीयकृत बँकेसह फायनान्स कंपनी व सावकारी कर्जाचा बोजा होता. ते गेल्या एक महिन्यापासून कर्जाच्या विचारात अस्वस्थ असल्याचे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.

एकीकडे कर्जाचा डोंगर वाढता असतांना शेतात मात्र सततच्या नापिकीमुळे अपयश येत होते. यावर्षी पीक चांगले आले तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतमालाचा भाव पडला व हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. परिणामी हिंमत माळी अजुन अस्वस्थ झाले व त्यांनी गळफास घेतली असे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी अकरा महिन्यांपूर्वी हिंमत माळी यांचा मोठा मुलगा विलास माळी यानेही सावकारी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. मोठ्या मुलानंतर वडिलांनाही कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करावी लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हिंमत माळी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. घटनेची सोनगीर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त मुलाचे वर्षश्राध्द घालण्याआधीच बापालाही आत्महत्येचा मार्ग स्विकारावा लागल्याने ग्रामस्थांतुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मुलाच्या आत्महत्येनंतरही बॅकेकडुन अडवणुक- तब्बल चार महिने हेलपाटे मारुनही पीककर्ज मिळत नाही म्हणुन, हिंमत माळी यांनी गेल्यावर्षी 16 मे रोजी येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये वीष प्राशन करण्याचा प्रयत्न केला होता. रडत रडत आत्महत्येचा संतप्त पावित्रा घेतल्यानंतर बॅकेने सध्याकाळीच पीककर्ज अदा केले. ससेहोलपटीमुळे संतप्त झालेल्या या शेतकर्‍याने हे पाऊल उचलले, याचा आकस मात्र बॅकेने मनात ठेवला व नंतर त्यांची अडवणूक केली.

हिंमत माळी यांचा गेल्या महिन्यात 36 हजार पीक विमा मंजूर झाला. त्यांचा लहान मुलगा भागवत माळी याने बँकेत जावुन हातपाय जोडले, माझ्या मोठ्या भावाने आत्महत्या केल्याने आम्ही अडचणीत आहोत, अशी विनंती करत पिक विम्याच्या रकमेची मागणी केली. परंतू बॅकेने अडवणुक करत पिक विम्याची रक्कम कर्जात जमा करत असल्याचे सांगुन सबंधित शेतकर्‍यास खाली हात पाठवले, असे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगितले जाते. एकाच कुटुंबातून दोन्ही कर्त्या व्यक्तींना अशा पध्दतीने अशा पध्दतीने स्वतःलाच संपवावे लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com