कापडणे येथील युवक कळवाजवळ अपघातात ठार

वाशी बाजारपेठेत जातांना झाला अपघात, गावात हळहळ
कापडणे येथील युवक कळवाजवळ अपघातात ठार

कापडणे - Kapadane - प्रतिनिधी :

कापडणे येथील 22 वर्षीय तरुणाचा वाशी (मुंबई) बाजारपेठेत भाजी विक्रीसाठी जात असतांना एका विचित्र अपघातात मृत्यू झाला.

आज दि. 12 रोजी पहाटे कळवा टोल नाक्याजवळ हा अपघात झाला. भूषण सुनील माळी असे या तरुणाचे नाव आहे. या अपघातात इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

कापडणे येथील भूषण सुनील माळी व जगदीश मोतीलाल खलाणे हे दोघे तरुण गोल भेंडी घेऊन मुंबई येथील वाशी बाजारपेठेत जात होते.

यावेळी कळवा टोलनाक्याच्या पुढे दोन्ही तरुण गाडी बाजूला लावून लघुशंकेसाठी गाडी खाली उतरले असता मागून येणार्‍या टँकरने (क्र एम.एच.46 ए. एफ. 1821) उभ्या असलेल्या वाहनाला धडक दिली.

यावेळी या तरुणांनी उभे केलेले वाहन, लघुशंकेसाठी थांबलेल्या या तरुणांवर उलटले. या अपघातात कापडणे येथील तरुण भूषण सुनील माळी हा तरुण जागीच ठार झाला तर जगदीश मोतीलाल खलाणे हा गंभीर जखमी झाला आहे.

अपघात घडल्यानंतर भूषण माळी याला खारघर येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. तर जगदीश मोतीलाल खलाणे याला सायन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मयत भूषण सुनील माळी याचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटूंबाच्या स्वाधीन करण्यात आला. अपघातात मयत झालेला भूषण माळी हा कुटूंबात एकुलता एक मुलगा होता. भूषण माळी याचे वडील हमाली काम करतात. भुषणने कुटूंबाला मदत करण्याच्या हेतूने स्वतःची गाडी घेतली होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com