धुळे । प्रतिनिधी Dhule

स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखेच्या पोलीस पथकाने वेषांतर करुन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड केली आहे. या टोळीकडून एक लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पिंपरखेडा, ता. शिंदखेडा शिवारातील खळ्यातून 90 हजार रुपये किंमतीचे शेळी, बोकड असा मुद्देमाल चोरुन नेला होता. याबाबत नरडाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास सुरु असतांना पोलिस निरिक्षक शिवाजी बुधवंत यांना मध्यप्रदेशमधील सेंधवा येथील सोनू कुरेशी व त्याच्या साथीदारांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे आज सेंधवा बायपास या ठिकाणी सापळा लावून सोनू कुरेशी याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस खाक्या दाखविताच त्याने फरहान उर्फ सोनू इकबाल कुरेशी (वय19) असे नाव असल्याचे सांगून त्याच्या साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली.

पथकातील अधिकारी व कर्मचार्यांनी वेषांतर करुन सेंधवा बायपास येथून मेहताब सुरभान वासकले, मांगीलाल रायचंद अजनारे, सुनिल पुनीया वासकले आणि सुफा मुन्सी कुरेशी या चार जणांना ताब्यात घेतले. तसेच सुफा कुरेशीकडून चार बोकड, सोळा बकर्या या विक्री करुन मिळालेले 90 हजार रुपये आणि मेहताब वासकले याच्याकडून 60 हजार रुपये किंमतीची मोटार सायकल असा एक लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.