धुळे जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग कार्यान्वित करावा!

धुळे जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग कार्यान्वित करावा!

आरोग्य संचालिका डॉ.अर्चना पाटील यांची सूचना

धुळे-प्रतिनिधी Dhule

कोरोना विषाणूच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग व पाच खाटा व्हेन्टिलेटरसह कार्यान्वित करावेत, अशा सूचना आरोग्य सेवेच्या संचालिका डॉ.अर्चना पाटील यांनी दिल्या आहेत.

डॉ.पाटील यांनी मंगळवारी (ता.27) रात्री जिल्हा रुग्णालयास भेट देवून आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.महेश भडांगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.शिवचंद्र सांगळे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश मोरे, वॉर्ड इन्चार्ज डॉ. अश्विनी भामरे, डॉ.स्वप्नील पाटील, डॉ.मोहसीन मुल्ला आदी उपस्थित होते.

डॉ.पाटील यांनी रुग्णांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, अतिदक्षता विभागासह ऑक्सिजनयुक्त बेडची संख्या वाढवावी. त्यासाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तातडीने कार्यान्वित करावा. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज नाही, अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. जेणेकरून गरजू रुग्णाला ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध होवू शकेल.

याबरोबरच ऑक्सिजन मॅनेजमेंट सिस्टिम कार्यान्वित करावी. त्यानुसार दर चार तासांनी ऑक्सिजनच्या नोंदी घेत रुग्णाच्या आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करावा. त्याची जबाबदारी स्वतंत्रपणे द्यावी.

जिल्हास्तरावरील रिक्त पदे भरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा

‘कोविड 19’ रुग्णांवर औषधोपचारासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रुग्णांवर औषधोपचार करावेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या वाढवीत कन्टेन्मेन्ट झोनची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. याशिवाय लसीकरण मोहीम व्यापकस्तरावर राबवीत अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करावे, असेही निर्देश डॉ.पाटील यांनी दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com