धुळ्यात महिला पोलीस कर्मचार्‍याचे घर फोडले

लाखोंचा मुद्देमाल लंपास, गुन्हा दाखल
धुळ्यात महिला पोलीस कर्मचार्‍याचे घर फोडले

धुळे । प्रतिनिधी Dhule

शहरातील देवपूर परिसरातील वलवाडी येथील संकल्प कॉलनीत शहर वाहतूक शाखेचे महिला पोलीस कर्मचार्‍याचे चोरट्यांनी घर फोडून घरातून साडेसहा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड सहा 6 हजार रुपये चोरुन नेले. याबाबत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी पोलिसाच्या घरी डल्ला मारुन पोलीस यंत्रणेपुढे आव्हान उभे केले आहे.

शहरातील देवपूर परिसरातील संकल्प कॉलनीत प्लॉट नंबर 28 मध्ये विठू माऊली बंगल्यात शहर वाहतूक शाखेतील महिला पोलिस कर्मचारी सौ. मोनाली व्ही. पगारे या राहतात. त्यांचे पती विठ्ठल आर. पगारे हे आर्मीत नोकरीला आहेत. श्री. पगारे हे कलकत्ता येथे राहतात. सौ. पगारे या बाहेरगावी गेले असतांना त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून लाखोंचा मुद्देमाल चोरुन नेला.

सौ. पगारे यांच्या घरात चोरी झाल्याचे शेजार्‍यांच्या लक्षात आली. चोरट्यांनी कपाटातून सोन्याची मंगलपोत साडेतीन तोळ्याची, लहान मंगलपोत दीड तोळ्याची, एक तोळ्याची चैन, पाच ग्रॅमची अंगठी व चांदीच्या साखळ्या तसेच दुसर्‍या कपाटातून पाच ते सहा हजार रुपये रोख चोरट्यांनी चोरुन नेले. चोरी झाल्याची माहिती पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर शहर वाहतुकीचे पीआय तसेच पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक मैनुद्दीन सय्यद व पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच ठसे तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय.पी.राजपूत, पोलीस उपनिरीक्षक एच.व्ही.हरणे, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय मोरे, पोलीस कॉन्स्टेबल राजू मिस्तरी, पोलीस कॉन्स्टेबल एम.एस.ब्राह्मणे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत माळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याबाबत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचार्‍यांच्या घरातच चोरट्यांनी डल्ला मारुन पोलीस यंत्रणेपुढे आव्हान उभे केले आहे.

चोरट्यांची हिंमत वाढली

धुळ्यात महिला पोलीस कर्मचार्‍याचे घर चोरट्यांनी फोडले. लाखोंचा मुद्देमाल चोरुन नेला. परंतू चोरट्यांनी कुठल्याही प्रकारचा सुगावा मागे सोडलेला नाही. चोरट्यांची हिंमत वाढली असून पोलिसांचे घर चोरटे फोडत आहे. या अगोदर पोलीस निरिक्षक, प्रांताधिकारी यांचे घर चोरट्यांनी फोडले होते. परंतू त्याचा तपास लागलेला नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com