धरण, तलावांमध्ये पोहणार्‍यांवर गुन्हे दाखल करा

जिल्हाधिकारी संजय यादव यांचे निर्देश
धरण, तलावांमध्ये पोहणार्‍यांवर गुन्हे दाखल करा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

धरण, तलावांत पोहण्यातून काही वेळेस दुर्घटना घडतात. अशा दुर्घटना टाळण्यासाठी धरण, तलावात पोहोणार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत. असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय यादव यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची नैसर्गिक आपत्ती व कोविड व्यवस्थापनाबाबत तसेच अन्य विषयांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव हे बोलत होते.

यावेळी महापालिकेचे आयुक्त अजिज शेख, उपवनसंरक्षक एम. एम. भोसले, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री. पवनीकर, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, डॉ. विक्रम बांदल आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, कोरोना विषाणूच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोरोना बाधित रुग्णांची गृह विलगीकरणाची सुविधा बंद करण्यात आली आहे. आता कोरोना विषाणू बाधित रुग्णांचे गाव पातळीवरच विलगीकरण करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन ग्राम पातळीवरील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करावयाचे आहे. या विलगीकरण कक्षांमध्ये पाणी, वीज, स्वच्छता आदी मूलभूत सोयी सुविधांची पूर्तता करावी.

पावसाळ्यास लवकरच सुरवात होणार आहे. पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने दक्षता बाळगावी. तसेच समन्वयातून कामे करावीत. नदी, नाले काठावरील अनधिकृत बांधकामे संबंधित यंत्रणांनी तातडीने हटवावीत. तालुका, ग्रामपातळीवरील आराखडे अद्ययावत करून त्याचा अहवाल सादर करावा. नदी, तलाव, धरण परिसरात काही वेळेस तरुण पार्टीसाठी एकत्र येतात. अशा व्यक्तींवरही कारवाई करावी. त्यासाठी तलाव, धरण परिसरात सुरक्षा रक्षक तैनात करावेत. निगराणीसाठी सीसीटीव्ही लावावेत. जलसंपदा विभागाने धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नदी काठावरील गावांना सतर्क करावे. धरणातील जलसाठ्याची अद्ययावत माहिती दररोज सादर करावी.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते, पुलांची पाहणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात. पाणी जमा होणार्‍या ठिकाणी उपाययोजना कराव्यात. पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज वितरण कंपनीने पथके गठित करावीत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळांची तपासणी करून घ्यावी.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक मनुष्यबळाचे आरोग्य विभागाने तातडीने लसीकरण करून घ्यावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com