धुळे - Dhule - प्रतिनिधी :

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात शिरपूर, शिंदखेडा, साक्री, धुळे ग्रामीण भागात प्रत्येकी शंभर या प्रमाणे ऑक्सिजन युक्त बेड निर्मितीच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.

नागरिकांनी कोविडची लक्षणे दिसताच जवळच्या रुग्णालयात तपासणी करून शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी धुळे शहरातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची पाहणी केली.

यावेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिकेचे आयुक्त अजिज शेख, उपायुक्त गणेश गिरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे आदी उपस्थित होते.

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध घोषित करण्यात आले आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. यादव, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, आयुक्त अजिज शेख यांनी कोविड केअर सेंटरची पाहणी करून आढावा घेतला.

निर्बंधांना धुळेकर नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबद्दल जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी धुळेकर नागरिकांचे आभार मानले असून यापुढेही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असेच सहकार्य अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेशा प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. शिरपूर, साक्री, शिंदखेडा आणि धुळे ग्रामीण क्षेत्रात प्रत्येकी शंभर ऑक्सिजनयुक्त बेड निर्मितीच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.

ते युध्द पातळीवर उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी आवश्यक निधी, मनुष्य बळाच्या भरतीसाठी मंजुरी देण्यात आली आहे.

पुढील महिन्यातील परिस्थिती विचारात घेवून जिल्हा प्रशासन सज्ज असून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.

याशिवाय आजही शंभर ऑक्सिजन युक्त बेड शिल्लक आहेत. त्यामुळे ऑक्सिजनयुक्त बेडची कुठेही कमतरता नाही असे त्यांनी सांगितले.

महापालिकेने ऑक्सिजनयुक्त आणखी शंभर बेड तयार करावेत, असे निर्देश दिले आहेत. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एवढेच नव्हे, तर त्यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला आहे. हे काम युध्द पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऑक्सिजनयुक्त बेडची कमतरता भासणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे.

मात्र, नागरिकांनी कोरोना विषाणूची वेळेत चाचणी करून रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे. अनेक रुग्ण सुरवातीला घरगुती उपचार करताना दिसून येत आहेत. त्यामुळे दगावणार्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येताच रॅपिड अँटिजेन चाचणी किंवा आरटपीसीआर चाचणी करून तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे.

म्हणजे वेळेत उपचार होवून जीवितहानी टाळण्यास मदत होईल. नागरिकांनी राज्य शासनाच्या नियमांचे पालन करावे. नियमितपणे मास्क वापरावा. सोशल डिस्टन्स पाळावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे.