सेल्फीच्या नादात तलावात बुडाला

27 तासांनंतर सापडला मृतदेह
सेल्फीच्या नादात तलावात बुडाला

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरानजीक असलेल्या नकाणे तलावाच्या काठावर सेल्फी फोटो घेण्याच्या नादात एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

घटनेनंतर मृतदेह पाण्यात बेपत्ता झाल्याने पट्टीच्या पोहणार्‍यासह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने शोध मोहिम राबविली. अखेर 27 तासानंतर सोमवारी सायंकाळी मृतदेह बाहेर काढण्यास यश आले.

साजिदअली लियाकतअली सैय्यद (वय 40 रा. प्लॉट नं. 11, अविष्कार कॉलनी, चाळीसगाव रोड, धुळे) असे मयताचे नाव आहे. तो रविवारी सायंकाळी मित्र रहिम शेख यांच्यासोबत नकाणे तलाव येथे फिरण्यासाठी गेला होता.

तलावाच्या काठावर पाण्यालगत असलेल्या दगडावर उभा राहून साजिदअली हा मोबाईलमध्ये सेल्फी फोटो काढत होता. त्यादरम्यान अचानक जोरात वादळी वारा आल्याने तोल जावून तो पाण्यात पडला. त्यानंतर मात्र त्याचा मृतदेह पाण्यात बेपत्ता झाला.

याबाबत तालुका पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पट्टीच्या पोहणार्‍यांना बोलवून त्यांच्या मार्फत शोध घेतला. मात्र मृतदेह हाती लागला नाही. त्यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलास पाचारण करण्यात आले. पथकाने साजिदचा शोध सुरू केला. अखेर सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता साजीदचा मृतदेह हाती लागला. याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तपास पोहेकाँ आर.यु. मोरे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com