जागतिक वैद्यकीय संघटनेच्या कोषाध्यक्षपदी डॉ.वानखेडकर

फेरनिवडीतून भारताचा, धुळ्याचा लौकिक उंचावला
जागतिक वैद्यकीय संघटनेच्या कोषाध्यक्षपदी डॉ.वानखेडकर

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

भारतातील आयएमए या नामांकित वैद्यकीय संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांची जागतिक वैद्यकीय संघटनेच्या (डब्ल्यूएमए) कोषाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे.

त्यांच्या निवडीने भारताला दुसर्‍यांदा प्रतिनिधित्व आणि बहुमान मिळालेला आहे. त्यामुळे भारताचा व धुळ्याचाही लौकिक उंचावला आहे.

कोषाध्यक्ष पदाची डॉ. रवी वानखेडकर 2023 पर्यंत धुरा सांभाळणार आहेत. या निवडीमुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

जगातील तसेच देशातील आरोग्य सेवेतील विषमता यावर ते आपल्या कारकिर्दीत भर देणार असून सर्वांना समान वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे, अशी डॉ.रवी वानखेडकर यांची भुमिका आहे.

सेऊल (साऊश कोरिया) येथे झालेल्या 217 व्या परिषदेत जागतिक वैद्यकिय संघटनेने डॉ. रवी वानखेडकर यांची कोषाध्यक्ष पदी फेरनिवड जाहीर केली.

करोनाच्या संकटकाळात आणि एकूणच वाटचालीत डॉ. वानखेडकर यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रामाणिकपणे झोकून देत अव्याहत कार्य सुरू ठेवले असून मानवहित जोपासले आहे.

त्याचा सन्मान म्हणून त्यांच्याकडे कोषाध्यक्ष पदाची दुसर्‍यांचा जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

डॉ. वानखेडकर हे 2018 मध्ये आयएमएच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांची ही यशस्वी कारकीर्द पाहून गेल्या वर्षी त्यांची सार्क वैद्यकीय संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली.

यानंतर त्यांनी कार्यकर्तृत्वाच्या बळावर जागतिक वैद्यकीय संघटनेपर्यंत मजल मारली आहे. डॉ. वानखेडकर कोलेरेक्टल सर्जन आहेत.

सामान्य कुटुंबातून वाटचाल करताना जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि सचोटी या चतुःसूत्रीच्या बळावर त्यांनी यशाला गवसणी घातली आहे.

जागतिक वैद्यकीय संघटनेच्या कोषाध्यक्ष पदावर निवड झाल्याचे जाहिर झाल्यावर डॉ.वानखेडकर म्हणाले की, अनेक देशात वैद्यकीय सेवेत विषमता दिसून येते.

आपण पुढील कारकिर्दीत आरोग्य सेवेतील विषमता कशी दुर करता येईल, यावर भर देणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या विचारांना चालना मिळाल्यास वैद्यकीय क्षेत्रात फार मोठी क्रांती होणार आहे, असे पत्रक आय.एम.ए धुळेच्या अध्यक्षा डॉ. जया दिघे आणि सचिव डॉ.महेश अहिरराव यांनी प्रसिद्धीस दिले आहे. धुळे आय.एम.एच्या वतीने अध्यक्षा डॉ. जया दिघेगावकर यांनी डॉ. रवी वानखेडकर यांचे कौतूक केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com