रेमडिसीवीर प्रकरणी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ

रेमडिसीवीर प्रकरणी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ

औषध प्रशासनाने सहा तास चौकशी करून देखील कारवाई शून्य

दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

दोंडाईचात रेमडिसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार झाल्याची तक्रार पुढे येवून यासंदर्भातील ऑडीओ, व्हीडीओ क्लीप व्हायरल झाल्यात.

प्रशासनाने दखल घेतली, चौकशीही झाली मात्र प्रत्यक्ष गुन्हा दाखल करण्यास खो वर खो दिला जात असल्याचेच दिसते आहे. यात नेमके कुठे पाणी मुरतेय? याबाबतची चर्चा होते आहे.

येथील खानदेश मेडिकल एजन्सी मार्फत रेमडिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार झाल्याचे प्रकरण मनसे व पोलीस मित्र संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी छुप्या कॅमेरात कैद केले होते.

याची तक्रार जिल्हाधिकारी व अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे केली होती. याची दखल घेत गुरुवारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी तब्बल सहा चौकशी केली होती याच चौकशीचा पंचनामा देखील केला असल्याचे माहिती आहे.

मात्र सहा तास चौकशी केल्यानंतर देखील कुठलीही कारवाई अद्याप पर्यंत करण्यात आलेली नसून शहरातील खानदेश मेडिकल एजन्सी हे एक होलसेल विक्रेते असून यांनी किरकोळ स्वरूपात रेमडिसिव्हर इंजेक्शन विक्री केलीच कशी..?

तसेच एजन्सी धारकाने रुग्णाच्या नातेवाईकांची बनावट कागदपत्र देखील तयार केल्याचे निष्पन्न झाले होते तरी देखील कारवाई करण्यात आली नसल्याने शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गुन्ह्याबाबत टाळाटाळ

अन्न, औषध प्रशासनाने सहा तास चौकशी केली. कागदपत्रात तफावतही जाणवली, या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी गुन्हा दाखल करेल असे म्हणत ते रवाना झालेत.

तक्रारदारच फिर्याद देण्यासाठी पुढे येत नसल्याचे सांगुन पोलिसही अलिप्त आहेत. तर तक्रारदाराच्या मते पोलिसांनी पंचनाम्यावर स्वाक्षरी घेतली. आता वैद्यकीय अधिकारी बघतील असे सांगण्यात आले.

विशेष म्हणजे आपण तक्रार का दाखल करावी? अशी वैद्यकीय अधिकार्‍यांची भूमिका असल्याचे समजते.

एकूणच काय तर या प्रकरणात सोयीस्करपणे झाकाझाक केली जात असल्याचे निदर्शनात येत असून याबाबत कोणाकडूनही ठोस उत्तरे मिळत नसल्याने पाणी मुरत असल्याची चर्चा होते आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com