दोंडाईचात रेमडीसीवीर प्रकरणी चौकशी

अन्न व औषध विभागाच्या पथकातर्फे सायंकाळी उशिरापर्यंत तपासणी
दोंडाईचात रेमडीसीवीर प्रकरणी चौकशी

दोंडाईचा - Dhule - श.प्र :

दोंडाईचातील खान्देश मेडिकल एजेन्सी मार्फत रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार झाल्याचे प्रकरण पुराव्यानिशी समोर येताच जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे.

दुपारनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने दोंडाईचात धाव घेवून सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी केली.

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या एका कोरोना बाधित रुग्णासाठी रेमडीसीवीर इंजेक्शनची गरज होती. त्यासाठी तिच्या मुलासह सहकार्‍यांनी शोधाशोध केल्याने दोंडाईचातच एका एजेन्सीज मार्फत इंजेक्शन मिळत असल्याची माहिती त्यांना मिळाली.

त्यानुसार तक्रारदार प्रशांत गिरासे यांच्यासह मित्रांनी जास्तीच्या दरात इंजेक्शन उपलब्ध करुन घेतले. पण या संपूर्ण प्रकरणाची ऑडीओ, व्हीडीओ क्लिप तयार करुन व्हायरल केली.

जिल्हाधिकारी संजय यादव यांच्यासह शासनाकडेही तक्रार करण्यात आली. याची दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरिक्षक महेश देशपांडे, सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांनी दोंडाईचात धाव घेतली.

पोलीस निरिक्षक दुर्गेश तिवारी, सहाय्यक निरिक्षक संतोष लोले, शासकीय पंच गंगेश्वर गवळे, लिपीक संजय सोनवणे, पोलीस कर्मचारी संदीप कदम, मुकेश अहिरे, योगेश पाटील, चंद्रकांत साळुंखे, संजय गुजराथी आदिंनी खान्देश मेडिकल एजेन्सीच्या संचालकांना बोलावून उशिरापर्यंत चौकशी केली. यात रुणाचे कागदपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती श्री.देशपांडे यांनी दिली.

अशीही बनवा बनवी

रुग्णाचे कागदपत्रे घेतल्याशिवाय इंजेक्शन देता येत नाही, असे असतांना संबंधित एजन्सीने कशाच्या आधारावर तेही अज्ञात ठिकाणी बोलावून इंजेक्शन उपलब्ध करुन दिले? याबाबत चौकशी सुरु आहे. मात्र यासाठी रुग्णांचे बनावट कागदपत्र तयार केल्याचे निष्पन्न झाले असे असतांना अन्न व औषध प्रशासनाकडूनही याबाबत सारवा सारव केली जात असल्याची चर्चा आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com