अखेर पंजाबराव राठोडसह चौघांवर गुन्हा दाखल

दोंडाईचा मोहन मराठे मृत्यू प्रकरण, राठोड फरार, तिघे पोलिस कर्मचारी अटकेत
अखेर पंजाबराव राठोडसह चौघांवर गुन्हा दाखल

दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

येथील मोहन मराठे संशयित मृत्यू प्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्यासह चार जणांवर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. यातील तिघा पोलिस कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली असून राठोड हे फरार झाले आहेत.

दोंडाईचा येथील नगरसेवक गिरधारीलाल रुपचंदानी यांच्या मालकीच्या मुकेश ऑइल मील व कैलास ट्रेडर्सच्या गोदामातून, 96 तांदळाचे कट्टे चोरीला गेले. रुपचंदाणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. गुन्ह्याची उकल करण्यासाठी संशयित म्हणून मोहन मराठे यांना दोंडाईचा पोलीसांनी ताब्यात घेतले होते मात्र त्याचदिवशी म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी रात्री साडे सातच्या सुमारास मोहन मराठे यांचा मृतदेह रामी रस्त्यावर संशयास्पद स्थितीत आढळून आला होता.

पोलिसांच्या ताब्यातील संशयित आरोपीचा अशा प्रकारे झालेला मृत्यू पहाता मराठा समाजासह अनेकांनी याविषयी आवाज उठवला. हे प्रकरण गंभीर असल्याचे बघून पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांनी लगेचच तपास सीआयडीकडे सोपवला.

सीआयडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवीकिरण दरवडे यांनी तपासाची चक्रे फिरवून आता चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा करुनही पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्न करणारे पोलिसच सीआयडीच्या जाळ्यात सापडले आहेत.

अखेर जाळ्यात अडकले

मोहन मराठे यास पोलिसांच्या ताब्यात असतांनाच मारहाण झाल्याने त्यास मृतावस्थेत पोलिसांनीच फेकून दिल्याचा संशय पहिल्या दिवसापासून व्यक्त करण्यात येत होता.

मृत मोहन मराठे यास पोलिस ठाण्यात आणण्याची, त्याला सोडून देण्याची वेळ यातही संशयाला जागा होती. प्रथमदर्शनी या प्रकरणी पोलिस झाकाझाक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने उपाधिक्षक दरवडे यांनी या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने करुन या संदर्भात घटनेच्यावेळी दोंडाईचा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक पंजाबराव जानकीराव राठोड, पोलिस कर्मचारी वासुदेव गोविंद जगदाळे, सीताराम दामू निकम, राहूल नंदलाल सोनवणे यांना मोहन मराठेंच्या मृत्यूस जबाबदार धरुन त्यांच्याविरुध्द भादंवि 306, 348, 201, 202, 218, 297, 120 (ब) 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक त्यांना यापुर्वीच निलंबित करण्यात आले होते. यातील राठोड हे फरार असून उर्वरीत तिघांना अटक करण्यात आली आहे.

तपासाची सुत्रे सुपर्द

या प्रकरणाचा योग्य दिशेने तपास करुन संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केल्यानंतर सीआयडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी दरवडे यांनी पुढील तपासाची सुत्रे याच विभागाचे नंदुरबार जिल्ह्यातील उपअधिक्षक राजेंद्र भावसार यांच्याकडे सोपवली आहेत. अधिक्षक अजय देवरे यांच्या मार्गादर्शनाखाली ते पुढील तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com