दोंडाईचा - Dondaicha - वि.प्र :

दोंडाईचा येथील नगरसेवक गिरधारीलाल रुपचंदानी यांच्या मालकीच्या मुकेश ऑइल मील व कैलास ट्रेडर्सच्या गोदामातून,96 तांदळाचे कट्टे चोरीला गेले. रुपचंदाणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. गुन्ह्याची उकल करण्यासाठी संशयित म्हणून मोहन मराठे यांना दोंडाईचा पोलीसांनी ताब्यात घेतले होते मात्र त्याचदिवशी म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी रात्री साडे सातच्या सुमारास मोहन मराठे यांचा मृतदेह रामी रस्त्यावर संशयास्पद स्थितीत आढळून आला होता.

आज या घटनेला दोन महिने उलटले तरीदेखील सीआयडी चा तपास अद्याप थंडबस्त्यात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मात्र या संदर्भात सीआयडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविकिरण दरवडे यांनी लवकरच दोषींवर कारवाई करण्याची शक्यता वर्तवली आहे.

मोहन मराठे यांच्या संशयास्पद मृत्यू संदर्भात दोंडाईचा पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, बिट हवालदार वासुदेव जगदाळे, ठाणे अंमलदार राजेंद्र चौधरी यांना निलंबित करण्यात आले.

त्यादिवशी तपासाची सूत्रे सीआयडीचे नाशिक विभागीय जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी हाती घेतली.

यासंदर्भात सीआयडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविकिरण दरवडे हे 7 डिसेंबर2020 रोजी दोंडाईचा विश्रामगृह येथे आले असता त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आता सर्व अहवाल प्राप्त झाले असल्याचे सांगितले.

मयत मोहन मराठे यांचे कुटुंबीय आणि दोंडाईचा येथील मराठा क्रांती समाजाच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना 23 नोव्हेंबर रोजी मयत मराठे कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी आमरण उपोषणास परवानगी मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले होते.

परवानगी मिळो अथवा न मिळो उपोषण करण्याची भूमिका घेतली होती.परंतू तरी देखील अजून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई सीआयडीकडून झालेली नाही.यासंदर्भात मयताच्या कुटुंबीयांकडून तपासकार्यात विलंब होत असल्याने दोषी त्याचा गैरफायदा घेऊन सुटतील अशी निवेदनात शंका व्यक्त केली होती.

दोंडाईचा शहरवासीयांचे या घटनेतील कोणते सत्य बाहेर येते याकडे लक्ष लागून आहे शिवाय घटनेतील 96 तांदळाचे कट्टे गेले कुठे यांचाही निपक्षपाती शोध घेतला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.