हस्ती बँकेला ‘बेस्ट एनपीए मॅनेजमेंट’ राष्ट्रीय पुरस्कार

हस्ती बँकेला ‘बेस्ट एनपीए मॅनेजमेंट’ राष्ट्रीय पुरस्कार
saibaba

दोंडाईचा - Dondaicha - वि.प्र :

दोंडाईचा मुख्यालय असलेल्या व राज्यभर कार्य विस्तारासोबत नावलौकिक प्राप्त, उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य व स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करणार्‍या दि हस्ती को-ऑप बँकेला कोऑपरेटिव्ह बँकांच्या मध्यम आकाराचा गटातून ‘बेस्ट एनपीए मॅनेजमेंट’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सदरचा पुरस्कार वितरणाचा ऑनलाइन सोहळा नुकताच झाला.

एनपीए मॅनेजमेंट हे बँकिंग क्षेत्रातील महत्वपूर्ण बाब आहे. यात बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता कशा प्रकारची आहे, यावरून बँकेची ओळख निर्माण होते. हस्ती बँकेचे आधारस्तंभ स्व. कांतीलालजी जैन यांनी नेहमीच बँकेचे कामकाज पारदर्शी ठेवण्याकडे लक्ष दिले. जे आहे ते प्रत्यक्ष दाखवायचे ही त्यांची शिस्त होती.

त्यामुळे बँकेने गेल्या आठ वषार्ंपासून आपला नेट एनपीए 0 टक्के राखण्यात यश मिळविले आहे. बँकेत कर्ज अदा करण्यापूर्वी कर्ज एनपीए होणार नाही याची पुरेपुर काळजी घेण्यात येते व काही कारणामुळे कर्ज खाते एनपीए झाल्यास त्याचे वसुली बाबत तेवढ्याच प्रकर्षाने कार्यवाही करण्यात येते.

बँकेचे एनपीए मॅनेजमेंट बाबत केलेले कार्य लक्षात घेऊन बँकिंग फ्रंट्रीयर या राष्ट्रीय पातळीवरील सहकारी, खाजगी व पब्लिक सेक्टर बँकांचे आर्थिक व आय.टी. क्षेत्रात विशेषत्वाने काम करणार्‍या या नावाजलेल्या संस्थेतर्फे नुकतेच मध्यम कॅटेगिरीतील नागरी बँकातून बेस्ट एनपीए मॅनेजमेंट साठीचा राष्ट्रीय पुरस्कार हस्ती बँकेस प्रदान करण्यात आला.

हस्ती बँक ही बँकिंग क्षेत्रात उत्तम शिस्त, प्रेमळ सेवा, नवनवीन सुविधा व नेहमीच ग्राहकांचे हित साधणारी बँक म्हणून ओळखली जाते. याचेच प्रतीक म्हणूनच हस्ती बँकेस आता पावेतो राज्य व राष्ट्रीय पातळीवरील एकुण 35 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

बँकेचे माजी अध्यक्ष मदनभाऊ जैन, अध्यक्ष कैलास जैन, उपाध्यक्ष पहलाज माखिजा, संचालक मंडळ, सर्व शाखा समिती चेअरमन व सदस्य तथा सीईओ कुचेरिया, जनरल मॅनेजर बोधवानी, वसूली विभागाचे प्रमुख पटेल, सर्व शाखा व्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी यांचा या कामात सहभाग आहे. सध्याच्या कोरोना काळात सुद्धा बँकेने आपल्या कर्ज वसुलीचे प्रमाण चांगले राखले आहे. यामुळे येणारे वित्तीय वर्ष अखेरचे निकालही चांगले येतील असे दिसून येत आहे. असे बँकेचे अध्यक्ष कैलास जैन यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com