ऑक्सिजन वापराचे काटेकोरपणे नियोजन करावे !

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे निर्देश, जिल्हाधिकारी कार्यालयात करोना विषाणू आढावा बैठक
ऑक्सिजन वापराचे काटेकोरपणे नियोजन करावे !

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना विषाणू बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन वापराचे काळजीपूर्वक आणि काटेकोरपणे नियोजन करावे. त्यासाठी ऑक्सिजन अधिकार्‍यांची नियुक्ती करावी. त्याबरोबरच करोना विषाणूच्या संभाव्य तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी पायाभूत सोयीसुविधांच्या निर्मितीवर आतापासूनच भर द्यावा, असे निर्देश नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., आयुक्त अजिज शेख, हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ.विक्रम बांदल (शिरपूर), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त श्री.गमे म्हणाले, जिल्ह्यात करोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी झाली, तरी आरोग्य यंत्रणेने अधिकाधिक आरटीपीसीआर चाचण्यांवर भर द्यावा. आठवड्यातून किमान 25 हजार चाचण्या होतील, असे नियोजन करावे. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील अतिजोखमीचे आणि संपर्कातील प्रत्येक व्यक्तीची चाचणी करावी. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता आणखी एक हजाराने वाढवावी. त्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. या प्रयोगशाळेच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करावा. तसेच अहवाल तातडीने मिळतील, असेही नियोजन करावे.

करोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या मृत्यूचे विश्लेषण करावे. त्यामागील कारणांचा शोध घ्यावा. रुग्ण व्यवस्थापन करून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे औषधेपचार करावेत. खासगी रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित प्रत्येक रुग्णांच्या बिलाचे लेखापरीक्षण करावे. त्यानंतर रुग्णाला डिस्चार्ज द्यावा. तसेच रुग्णालयांना वेळोवेळी भेटी देवून तपासणी करावी. कोरोनाबाधित रुग्णाला आवश्यकतेप्रमाणे कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड हेल्थ हॉस्पिटल्मध्ये दाखल करावे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी गृह विलगीकरण पध्दत बंद करावी, अशाही सूचना आयुक्त श्री.गमे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री.यादव यांनी सांगितले, करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात सध्या दोन हजार 346 रुग्ण असून पॉझिटिव्हीटी दर कमी होण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूच्या दररोज किमान पाच हजार चाचण्या होतील, असे नियोजन करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. लसीकरणासाठी येणार्‍या प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी खासदार, आमदार, डीआरडीओ, सामाजिक दायीत्व निधीतून ऑक्सिजन प्रकल्प 30 जून 2021 पर्यंत कार्यान्वित होतील. रेमडेसिव्हर इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा होत आहे. जिल्हा रुग्णालयात महानगरपालिका, श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या सहकार्याने जम्बो कोविड बाह्य रुग्ण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तेथे 24 तास रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.जि.प.च्या सीईओ वान्मथी सी. यांनी सांगितले, लसीकरणासाठी येणार्‍या नागरिकांच्या चाचणीसाठी मोबाईल व्हॅन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. आयुक्त श्री.शेख यांनी सांगितले, कोरोनाबाधित रुग्णांच्या बिलांच्या तपासणीसाठी आठ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके नियमितपणे बिलांचे लेखापरीक्षण करीत आहेत, असेही सांगितले.

जिल्हा रुग्णालयास भेट, ऑक्सिजन प्रकल्पाच्या जागेची पाहणी

आयुक्त श्री गमे यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देवून जम्बो कोविड ओपीडी आणि ऑक्सिजन प्रकल्पाच्या नियोजित जागेची पाहणी केली. तसेच मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड ग्रीकल्चर, पुणे यांच्याकडून धुळे जिल्ह्यास 50 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रटर उपलब्ध झाले. त्याचे वितरण आयुक्त श्री.गमे यांच्या हस्ते करण्यात आले. याचवेळी आयुक्त श्री.गमे यांच्या हस्ते फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री.यादव यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या धुळे शाखेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com