धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शिरपूर तालुक्यातील सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे आदिवासींना त्रास, भ्रष्टाचार, अनागोंदी व भोळ्या भाबड्या आदिवासींच्या आरोग्याचे छळ केंद्र असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला.

या ठिकाणच्या गंभीर समस्यांसह जिल्हा परिषदेत चाललेल्या अनागोंदी कारभाराचा आपण भांडाफोड करु असेही त्यांनी म्हटले आहे.

या संदर्भात श्री. गोटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेत भाजपाची एक छत्री सत्ता आल्यापासून बेकायदेशीर कारभार, अनागोंदी कायदे धाब्यावर बसवून काम करण्याची हुकूमशाही वृत्ती या गोष्टींचा व दुष:परिणाम जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या सर्व विभागांवर झाला आहे.

गरीब आदिवासींच्या जीवनाशीच खेळ खंडोबा मांडला आहे. जी दुरवस्था सांगवीमध्ये आहे. तीच परिस्थिती थोड्या फार फरकाने सर्वत्र आहे.

सांगवी येथील आरोग्य केंद्रात बाळंतपणासाठी दवाखान्यात दाखल झालेल्या महिलेला आलेला अनुभव ह्रदयद्रावक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जि.प सदस्य श्री. कन्हैयालाल पावरा उर्फ कनुदादा यांनी मला किमान आकरा फोन करुन सदर परिस्थितीची माहिती दिली.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे फोन बंद व ऑऊट ऑफ रेंज होते. त्यांना मेसेज दिल्यावरही उलटा फोन करायची सभ्यता या अधिकार्यांना दर्शविता आली नाही.

प्रथामिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय आरोग्य अधिकार्याचेही फोन बंद होते. एका परिचारीकेने दोन तीन दिवस-रात्र जागून एकाच टेबलावर व एकाच चादरीवर एकटीने आठ बाळंतपणे केली.

तरी एकाही वरिष्ठ अधिकार्याला त्या परिचारीकेची दया आली नाही. अखेरीस जिल्हाधिकारी श्री. संजय यादव यांच्याशी तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानी संपर्क साधला असता त्यांनी अतिशय गांभीर्याने दखल घेऊन आदेश देऊन तातडीने ती व्यवस्था केली.

या आरोग्य केंद्रावर तीन वैद्यकीय अधिकारी आहेत. किमान डझनभर कर्मचारी परिचारिका, शिपाई, सुपरवायझर, कार्यरत आहेत.

दुर्दैवाने यातील एकही व्यक्ती सलग तीन दिवस आरोग्य केंद्राकडे फिरकला सुध्दा नाही. गंभीर व संतापजनक घटना म्हणजे सौ. प्रमिला विनोद पावरा रा. खैरखुटी ही महिला बाळंतपणासाठी सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रावर आली असता तिला अशाही परिस्थितीत शिरपूरला पाठवले.

तेथून धुळ्याला आणि धुळ्याने पुन्हा परत पाठविल्याने सांगवी आरोग्य केंद्रातच तिचे बाळंतपण झाले. याच कालावधीत एका नवजात बालकाला उपचारा अभावी प्राण गमवावे लागले.

आपण ही प्रकरणे तडीस लावण्याचा संकल्प केला असून त्या गरीब आदिवासींना न्याय मिळवून दिल्या शिवाय आणि ते आरोग्य केंद्र दुरुस्त झाल्या शिवाय स्वस्त बसणार नाही, असेही श्री. गोटे यांनी म्हटले आहे.