धुळे : खुनाचा पाच दिवसात छडा ; दोघं ताब्यात
धुळे

धुळे : खुनाचा पाच दिवसात छडा ; दोघं ताब्यात

लुटी दरम्यान प्रतिकार केल्याने खून केल्याची कबुली

Rajendra Patil

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

धुळे - Dhule

शहरातील तरुणाच्या खुनाच्या गुन्ह्याचा पाच दिवसातच छडा लावण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांनी तरुणाला लुटत असताना त्याने प्रतिकार केल्याने त्याच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची कबुली दिली आहे.

दि.१० ते ११ जुलैदरम्यान मध्यरात्री कालिकामाता मंदिराचे जवळील मोकळ्या जागी पांझरा नदीकिनारी गरूड कॉम्प्लेक्स येथील ट्रॅकॉन कुरीअर्स येथे काम करणारा जितेंद्र शिवाजी मोरे याचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खुन केला होता. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने गुन्हा केल्यानंतर कुठलाही पुरावा मागे सोडलेला नव्हता, त्यामुळे हा गुन्हा कोणी व कसा केला याबाबत काहीएक माहिती मिळत नव्हती.

गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत असताना माहिती मिळाली की, दि. ११ रोजी रात्री १२.४० वाजे दरम्यान काही मुले हे बसस्टॅन्ड करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना त्यांना कमलाबाई शाळेजबळ एका मोटार सायकलवरून आलेल्या दोघा अनोळखी इसमांनी अडवून त्यांना मारहाण करून त्यांचेजवळील १२०० रुपये व दोन मोबाईल हिसकावून नेले आहेत. त्यानुसार संबंधित मुलांचा शोध घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस करून त्यांचेकडून संबंधित मोटारसायकलस्वाराचे वर्णन प्राप्त केले.

प्राप्त केलेल्या वर्णनानुसार संशयित राहुल उर्फ हंक्या सुनिल घोडे (वय-१९, रा. दैठणकर नगर, वाडीभोकर रोड, धुळे) यास काल पोलिसांनी ताब्यात घेतले. व चौकशीत त्याने मयत तरुणाचा मोबाईल व पैसे लुट करत असताना प्रतिकार केल्याने रागाच्या भरात साथीदार हर्षल जिजाबराव पाटील याचे मदतीने डोक्यात दगड घालून केल्याचे कबुल केले आहे.

संशयित आरोपी राहुल उर्फ हंक्या सुनिल घोडे यास धुळे शहर पोलिसांच्या ताब्यात दिले असून संशयित हर्षल जिजाबराव पाटील हा पोलीस त्याचे मागावर असल्याची खबर लागल्याने पळून जात असताना मोटारसायकलवरून पडून जखमी झाला. तो खासगी रुग्णालयात उपचार घेत होता.

उपचारानंतर पोलिसांनी त्यालागुन्ह्यात अटक केली आहे. राहुल घोडे याचेविरूद्ध देवपूर व पश्चिम देवपूर पोलिसात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक- हनुमान उगले, पो.हे.कॉ. रफीक पठाण, श्रीकांत पाटील, संजय पाटील, पो.ना. प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, राहुल सानप, मयुर पाटील, तुषार पारधी व चा.पो.कॉ.गुलाब पाटील यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com