माझी वसुंधरामध्ये धुळे महापालिका अव्वल

बैठकीत आयुक्त अजीज शेख यांची माहिती, महापलिकेला पत्र प्राप्त, अजून चांगले काम करा!
माझी वसुंधरामध्ये धुळे महापालिका अव्वल

धुळे । प्रतिनिधी Dhule

माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ठ कामगिरी करुन राज्यातील पहिल्या दहामध्ये धुळे महापालिकेचा समावेश झाला आहे. त्याबाबत महापालिकेला पत्रही प्राप्त झाले आहे. आता आणखी चांगले काम करण्याचा मानस आयुक्त अजीज शेख यांनी व्यक्त केला.

महापालिकेच्या सभागृहात आयुक्त अजीज शेख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला महापौर चंद्रकांत सोनार, महिला व बालकल्याण सभापती वंदना थोरात, स्थायी सभापती संजय जाधव, सभागृहनेते राजेश पवार, विरोधी पक्षनेते साबीर शेख, उपायुक्त शिल्पा नाईक आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना श्री. शेख म्हणाले की, राज्यात गेल्या वर्षापासून माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. राज्य शासनाचे हे अतिशय महत्वाकांक्षी अभियान आहे. त्यात धुळे महापालिकेनेही सुमारे वर्षभरापासून सहभाग घेतला आहे. पृथ्वी, वायु, जल, अग्नी, आकाश या पंचतत्वांवर आधारीत उपाययोजना करुन शाश्वत, निसर्ग पुर्वक जीवन पध्दती अवलंबण्यासाठी हे अभियान सुरु केले आहे.

यात गेल्या वर्षभरापासून महापालिकेने सक्रीयपणे काम केले आहे. त्यात नागरिकांसह विविध सामाजिक संघटना, नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व महापालिकेचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपले योगदान दिले आहे. त्याचे फलित म्हणून वर्षभराच्या कामगिरीत धुळे महापालिकेने राज्यातील पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले आहे. राज्य शासनाने नुकतेच पहिल्या दहा महापालिका निवडल्या आहेत.त्यात धुळे महापालिकेचाही समावेश आहे. त्याबाबत महापालिकेला पत्रही प्राप्त झाले आहे. महापालिकेने या अभियांतर्गत केलेल्या कामांचे प्रेझेंटेशन देखील शासनाकडे सादर करण्यात येणार आहे असे सांगितले.

माझी वसुंधरा अभियांतर्गत आता आणखी सक्रीयपणे सुधारीत व चांगले काम करायचे आहे. त्याचे नियोजनही करण्यात आले आहे. असे श्री. शेख यांनी सांगितले. महापालिकेतर्फे या अभियानातर्फे सायकल रॅली, महिन्याच्या पहिल्या सोमवारी महापालिकेत सायकलीवर येणे, इलेक्ट्रीक वाहनांसाठी महापालिकेच्या गेटजवळ मोफत चॉर्जींग पॉईंट बसविण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com