धुळ्यात ‘स्वयंभू’ला कचरा संकलनाचे काम

स्थायीच्या सभेत मान्यता; ठेकेदाराच्या कामाचे होणार मूल्यमापन
धुळ्यात ‘स्वयंभू’ला कचरा संकलनाचे काम
dhule municipal corporation

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील घनकचरा वाहतुक व संकलन निवीदा दराच्या विषयावर मनपाची स्थायी समितीची सभा चांगली गाजली. कचरा संकलनाची जबाबदारी मनपा प्रशासनाच्या सादर केलेल्या प्रस्तावानुसार स्थायी समितीने ‘स्वयंभू’ या संस्थेला पुढील 7 वर्षांसाठी दिली आहे.

विशेष म्हणजे दर सहा महिन्यांनी या ठेकेदाराच्या कामाचे मुल्यमापन होणार असून अपेक्षित काम न केल्यास संबंधीत ठेका रद्द करण्याचे देखील अधिकार स्थायीकडे राखून ठेवल्याची माहिती सभापती संजय जाधव यांनी सभेत दिली.

महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात आज सायंकाळी स्थायी समितीची सभा झाली. यावेळी सभापती संजय जाधव, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ आदींसह नगरसेवक व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सभेत अजेंंड्यावरील एकुण दहा विषयांवर चर्चा झाली. त्यात सर्व विषयांना मंजूरी देण्यात आली. घनकचरा वाहतुक व संकलन निवीदा दराच्या विषयावर नगसेवक शितलकुमार नवले यांनी प्रशासनाने वॉटर ग्रेस ठेकेदाराची निवीदा काढतांना अन् नव्याने देण्यात येणार्‍या कचरा ठेक्याच्या निविदेत काय फरक आहे, याबाबत विचारणा केली.

60 टक्के दरवाढ होणार असून ठेकेदाराला ती देवू नये, असे सुचना करत याविषयाला विरोध दर्शविला. तर नगसवेक अमीन पटेल यांनी ठेकेदाराने योग्य पध्दतीने काम करावे अन्यथा चार महिन्यात त्याच्यावर कारवाईची तरतुद करावी, अशी सुचना केली. नगरसेवक सुनिल बैसाणे यांनी वॉटर ग्रेस या ठेकेदाराला काम देतांना काढलेल्या निवीदेतील त्रुटींबाबत चर्चा केली. तसेच पत्रकबाजी करणार्‍या विरोधकांनी वॉटर ग्रेसचा बॉस कोण होते? याबाबत खुलासा करावा, असे जाहीर आवाहन केले. या निविदे मंजूरीसाठी महासभेची मंजूरी आवश्यक होती किंंवा नाही, असा प्रश्न उपस्थित केला. नगरसेवक नागसेन बोरसे यांनीही शहरातील कचरा प्रश्न हा निकाली निघावा, अशी अपेक्षा व्यकत करत तक्रारीविना काम करायचे असेल तर वाढीव दराने मंजूरी द्यावीच लागेल, असे सांगत कचरा डेपोवरील कामात सुसूत्रता यावी, यासाठी सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, अशी सुचना केली.

त्यावर सहा.आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी वॉटरग्रेस कंपनीला कामाचा अनुभव नसल्याने त्यांनी कमी दर भेटल्याचे यावेळी स्पष्ट केले. शितलकुमार नवले यांनी 15 व्या वित्त आयोगाचे निकष ठरलेले नसतांना तसेच महासभेची मान्यता नसतांना विषयाला मंजूरी देणार कशी, असा सवाल केला. चर्चेअंती सभापती संजय जाधव यांनी शहरातील कचराप्रश्न निकाली काढण्यासाठी या विषयाला मंजूरी देत असल्याचे स्पष्ट केले. तसेच दर सहा महिन्यांनी ठेकेदाराच्या कामाचे मुल्यमापन स्थायी समिती करणार असून योग्य काम नसेल तर ठेका रद्द करण्याचे देखील तरतुद यात करणार असल्याचे सांगितले. करारनामा झाल्यानंतर तो स्थायीच्या पुढे सादर करावा. तसेच नागरीकांच्या सुविधेसाठी जीपीएस अ‍ॅप तयार करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com