धुळे जिल्हयात म्युकरमायकोसिस आजाराचे प्रमाण अधिक

वैद्यकीय भरपाई द्या, आ.कुणाल पाटील यांची मागणी, आरोग्य मंत्र्यांशी चर्चा
धुळे जिल्हयात म्युकरमायकोसिस आजाराचे प्रमाण अधिक

धुळे । प्रतिनिधी Dhule

म्युकरमायकोसिस आजाराचे प्रमाण धुळे जिल्हयात मोठ्या प्रमाणात आढळुन आले आहे. कोरोनानंतर रुग्णांना म्युकरमायकोसिस आजार होतो. महाविकास आघाडी सरकारने अशा रुग्णांचा दि.13 मे पासून महात्मा फुले जीवनदायी योजनेत मोफत उपचाराचा निर्णय घेतला मात्र त्या आधीच्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना किंवा त्यामुळे मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना वैद्यकिय बिलाची भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांनी आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांच्याकडे केली असून याबाबत आरोग्य मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांच्याशी झालेल्या चर्चेत आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की, कोरोना आजारावर उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस या जीवघेण्या आजाराची लागण होत आहे. या आजाराचे प्रमाण धुळे जिल्हयात मोठ्या प्रमाणात आढळुन आले आहेत. नाकातला श्वास कोंडणे, काळ्या बुरशीचा चट्टा नाक, टाळू येथे आढळणे, डोळा दुखणे, सुजणे दृष्टी कमजोर होणे अशी लक्षणे आढळून येतात. तत्काळ उपचार झाल्यास रुग्ण बरा होतो. अन्यथा डोळा गमवावा लागतो तर काहींचा मृत्यूही ओढवला जातो. या सर्व लक्षणांमुळे उपचार करतांना रुग्णांची आर्थिक फरफट होते.

आधीच कोरोना आजारावर मोठ्या प्रमाणात खर्च करुन रुग्ण व त्याचे नातेवाईक आर्थिक संकटात सापडलेले असतात. अशावेळी कोरोनानंतर पुन्हा या आजारावर खर्च करणे त्यांच्या ऐपतीबाहेर जाते. दि.13 मे 2021 पासून म्युकरमायकोसिसच्या आजाराच्या रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेत मोफत उपचाराचा महत्वपूर्ण निर्णय घेवून महाविकास आघाडी सरकारने रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र दि.13 मेच्या आधी म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

अशा रुग्णांनी खाजगी रुग्णालयात उपचार करुन घेतले आहेत. त्यामुळे त्या रुग्णांना शासनाकडून वैद्यकीय खर्चाची भरपाई मिळावी अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांनी आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांच्याशी चर्चा करतांना केली.यावेळी आरोग्य मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासनही दिले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com