धुळे - Dhule - प्रतिनिधी :

राज्यात अपंगांसाठी अनेक योजना आणि सुविधा असल्या तरी त्या केवळ कागदावर आहेत. कारण या योजना अपंगांतील खर्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्यांच्या संकुचित व कामचुकार मानसिकतेचा अडसर निर्माण होतो.

यासाठी संघर्ष करावा लागतो. वास्तविक आम्ही अपंग असलो तरी आम्हाला कादेशीर हक्क हवे आहेत. केवळ सहानुभूती नको, अशी भावना आजच्या चर्चेत व्यक्त करण्यात आली.

जागतीक अपंग दिनाच्या निमित्ताने दै.देशदूतच्या ऑनलाईन संवाद कट्टा या कार्यक्रमात आज ‘अपंग आहोत, लाचार नाहीत’ या विषयावर चर्चा करण्यात आली.

यात प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या शहराध्यक्षा अॅड.कविता पवार, अपंग पुनर्विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय सरग, कार्याध्यक्षा अपुर्वा उमेश कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. ब्युरोचिफ अनिल चव्हाण यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

अॅड.पवार म्हणाल्या, अपंगांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात कामचुकारपणा करणार्या, कर्तव्यात कसूर करणार्यांना अपंग पुनर्वसन कायदा 2016 च्या कलम 89 अन्वये पाच हजारापासून ते पाच लाखांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

मात्र शासकीय चौकटीतली निर्ढावलेली मंडळी या कायद्यालाही जुमानत नाही. शासनाच्याच निर्णयांचा आधार घेत योजनांचा लाभ घेण्यासाठी मागणी केली असता आमच्या अपंगांकडेच शासन निर्णयाची प्रत मागितली जाते.

वास्तविक शासन निर्णय सांभाळून ठेवणे, त्याचा अभ्यास करणे, त्याची अंमलबजावणी करणे हे अधिकारी व कर्मचार्यांचे कर्तव्यच आहे. बर्याचदा आम्हीच शासन निर्णय आणून देतो. नियमांवर बोट ठेवून त्यातील तरतूदी लक्षात आणून देतो. तेव्हाकुठे नाईलाजाने काही अधिकारी मान्य करतात. त्यातही वेळकाढूपणा करुन लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवले जाते.

याशिवाय काही आर्थिक व्यवहार करुन इतर खोट्या लाभार्थ्यांना योजनांमध्ये घुसविले जाते, असाही अनुभव आहे. यासाठी अपंगांनीच संघटीत होण्याची गरज आहे.

आम्ही राज्यमंत्री तथा प्रहार संस्थेचे संस्थापक बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहारच्या माध्यमातनू करीत असलेल्या कामांमुळे काही प्रमाणात बदल जाणवतो आहे.

परंतु अद्याप शासकीय अधिकारी कर्मचार्यांची मानसिकता आणि जनतेची मानसिकता बदलविण्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागतील. जनतेने आमच्याकडे अपंग म्हणून सहानुभूतीने न बघता आम्हाला आमच्या हक्क, अधिकारांमध्ये बाधा येईल असे काही करु नये, अशी अपेक्षाही अॅड.पवार यांनी व्यक्त केली.

संजय सरग म्हणाले, अपंगांसाठी आपण संघटनेच्या माध्यमातून काम सुरु केल्यापासून अनेक गैर प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.

यासाठी बर्याचदा अधिकार्यांशी संघर्षही करावा लागतो. अपंग असल्याचे बोगस दाखले मिळवून देणार्या दलालांचा इथे सुळसुळाटच होता. यात अधिकारी व कर्मचार्यांचे संगनमत होते. या विषयावर आपण विशेष लक्ष देवून असल्या गैर प्रकारांना लगाम लावण्याचा प्रयत्न करतो आहोत.

तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी, तीन टक्के, पाच टक्के सुविधांचा फायदा मिळवून देण्यासाठी देखील आपले प्रयत्न सुरु आहेत. अपंगासाठीच्या घरकुलांचा विषय गंभीर आहे. याच्या अंमलबजावणीसाठी शासन पातळीवरुनच ठोस निर्णय होणे गरजेचे आहे. असे सांगतांनाच शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील अपंगांच्या समस्या अधिक असल्याचे श्री.सरग म्हणाले.

अपूर्वा कुलकर्णी यांनी इमोशन आणि मोटीवेशन या विषयात हात घालून गंभीर विषयांकडे लक्ष वेधले. अपंगांकडे तुच्छतेने, तिरस्काराच्या भावनेने बघितले जाते. मुळात घरातूनच त्यास सन्मानाची इतरांप्रमाणेच वागणूक मिळायला हवी.

समाजाने त्याला वेगळ्या नजरेने न पाहता सहकार्य करता येत नसेल तर किमान तिरस्कार तरी करु नये अशी अपेक्षा आहे.

बरेच अपंग इमोशनमध्ये अडकतात, त्यांचा वापर करुन घेतला जातो. मात्र अपंगांना मोटीवेट करण्याची खरी गरज आहे. त्यांच्या शिक्षणाकडे, आरोग्य व इरत सुविधांकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासोबतच अपंगांचे पालक आणि आम जनेतेची अपंगांबद्दलची मानसिकता बदलविण्यासाठी विशेष प्रयत्नाची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.

अपंगांना दिव्यांग म्हणून प्रश्न सुटलेले नाहीत. तर अपंगांच्या हक्क अधिकारात बाधा येत असेल, अडथळा निर्माण होत असेल तर त्याची दखल घेतली जाणे, प्रसंगी संबंधितांवर कारवाई होण्याची आवश्यकता असल्याचे या चर्चेतून मांडण्यात आले.

खोटे, चुकीचे करु नका !

केवळ योजनांचा लाभ मिळविण्यासाठी, सवलती किंवा स्वार्थासाठी अपंगत्वाचे खोटे दाखले घेवून चुकीचे काम करु नका. आपल्या एखाद्या बांधवाला कसला फायदा मिळत असेल तर त्याचे पाय ओढून आपणच आपल्या अपंग बांधवांचे नुकसान करु नका.

एकमेकांच्या हेव्या दाव्यातून काही साध्य होण्या ऐवजी आपणच हक्क अधिकारांपासून वंचित राहू. त्यामुळे खोटे, चुकीचे काही करु नका असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले.