धुळे

धुळ्यात तिहेरी तलाकचा गुन्हा दाखल – वडीलही आरोपी

Balvant Gaikwad

प्लॉट खरेदीसाठी पाच लाखांची मागणी करुन छळ केला व यातून तिहेरी तलाक दिल्याप्रकरणी आठ जणांविरुध्द आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील घड्याळवाली मशीद परिसरातील वल्लीपुरा भागातील व हल्ली कबीरगंज येथे वास्तव्यास असलेल्या 20 वर्षीय विवाहितेचा जुबेर शाह रा. वल्लीपुरा याच्या सोबत विवाह झाला होता. सदर विवाहितेने प्लॉट खरेदी करण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावेत अशी वारंवार मागणी सासरकडील मंडळीकडून होत होती. पैसे आणत नसल्यामुळे विवाहितेच्या पतीने चारित्र्याचा संशय घेत तिला मारहाण केली. व शिवीगाळ करुन दमदाटी केली. माझ्या चारित्र्याचा संशय घेत जुबेरशाह याने माझ्या मामाकडे तीन वेळा तलाक देत आहे असे बोलून मला तलाक दिला.

विवाहितेच्या तक्रारीवरुन आझादनगर पोलिस ठाण्यात भादंवि 398 (अ), 323, 504, 506, 34 सह मुस्लीम महिला विवाहावरील हक्काचे संरक्षण कायदा सन 2019 चे कलम चार अन्वेय पती जुबेर शाह मोहम्मद शाह, सासू जुलेखा उर्फ मुन्नी शाह, विवाहितेचे वडील अकील शाह शब्बीर शाह, काका शकील शाह शब्बीर शाह, रईस शाह शब्बीर शाह, काकू परवीन रईस शाह व आजेसासू कमरुन्निसा शब्बीर शाह, नणंद यास्मीन उर्फ राणी मोहम्मद शाह, शब्बीर शाह अमीन शाह यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडीलही आरोपी

विवाहितेने तिहेरे तलाकबाबत आझादनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये विवाहितेच्या वडिलांचाही समावेश आहे. धुळ्यात तिहेरी तलाकाचा हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com