ट्रक चालक, मालकासह तिघांना मारहाण करून लुटले, चौघे ताब्यात

ट्रक चालक, मालकासह तिघांना मारहाण करून लुटले, चौघे ताब्यात

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

सोनगीर ते दोंडाईचा रस्त्यावर दुचाकी रस्त्यात आडवी लावून ट्रक चालक, मालकासह तिघांना मारहाण करत लुटण्यात आले.

याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.

ट्रक चालक मोहम्मद युनुस मोहम्मद शेख (वय 52 रा. श्रीराम नगर, जगतगिरी कुतुबउल्ला पुर जि. के.व्ही. रंगारेड्डी, तेलंगाणा) हा त्यांच्या ताब्यातील ट्रक (क्र. टीएस 12 युबी 07399) घेवून दि. 25 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सोनगीर-दोंडाईचा रस्त्याने जात होता.

त्यादरम्यान मेथी गावाच्याजवळ फरशी पुलावर मागून दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी ट्रकला थांबविले.

दुचाकी ट्रकच्या समोर आडवी लावून त्यांनी ट्रकवर चढून चालक मोहम्मद शेख व मालक मोहम्मद मुशफिर अहमद यांना लाथेने तोंडावर मारले.

क्लिनर साईडला बसलेला पार्टी मालक अवधनारायण अक्षयलाल यादव याला हाताबुक्यांनी मारहाण केली.

तसेच चाकुचा धाक दाखवून तिघांच्या शर्टाच्या खिशातील एकुण 23 हजार 500 रूपये रोख व तीन मोबाईल असा एकुण 65 हजार 500 रूपयांचा मुद्येमाल जबरीने काढून पळून गेले.

याप्रकरणी ट्रक चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून पंकज संजय पवार (वय 27), सागर हिरालाल बोरसे (वय 20 रा. वरझडी ता. शिंदखेडा), विनायक साहेबराव फुलपगारे (वय 26), जितेंद्र बाबुराव अहिरे (वय 20 रा. मेथी ता. शिंदखेडा) व फरार असलेला संदीप भिल (रा. मेथी) यांच्याविरूध्द शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून एक मोबाईल हस्तगत केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com