धुळ्यात भेसळयुक्त दारूचा पुरवठा

धुळ्यात भेसळयुक्त दारूचा पुरवठा

एकावर गुन्हा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरात भेसळयुक्त दारूचा पुरवठा केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी महाराष्ट्र लिकर मालक राजेंद्र गलाणी यांच्याविरोधात न्यायालयाच्या आदेशाने शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मोहाडी उपनगरातील शिल्पा राजेंद्र शिंदे यांनी परिवहन पास अन्वये फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र लिकर मालक राजेंद्र चंद्रमल गलाणी यांच्याकडून त्यांच्या देशी दारू विक्रीचा परवाना क्र. 56 अन्वये टँगो पंचचे 148 बॉक्स, मुंबई टँगो सत्राचे 40 बॉक्स व होडकाचे 40 बॉक्स असे 228 दारूचे बॉक्स मागविले होते.

दि. 9 फेब्रुवारी दुपारी त्या दारूची विक्री केल्यानंतर ग्राहकांना काही वेळातच मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. त्या ग्राहकांना पती राजेंद्र शिंदे यांनी डॉ. अविनाश सोनवणे यांच्या गुलमोहर क्लिनीक येथे नेले.

उपचारादरम्यान डॉक्टरांनी, ग्राहकांनी सेवन केलेली दारू ही भेसळयुक्त असल्याने त्यांना हा त्रास होत असल्याचे सांगितले.

त्यानंतर राजेंद्र शिंदे यांनी दारूचे सर्व खोके उघडून पाहीले. त्यात काही बाटल्यांच्या लेबलवर बँच क्रमांक छापलेला नव्हता.

बाटलीत दारूमध्ये घाण होती. तसेच रंगही बदललेला दिसला. राजेंद्र गलाणी याने विक्री केलेल्या दारूमुळे त्याचे सेवन करणार्‍या लोकांच्या जिवीतास धोका होवू शकतो, हे माहित असतांना देखील त्याने जाणीवपुर्वक विक्री केली, अशी फिर्याद शिल्पा शिंदे यांनी पोलिसात दिली आहे.

त्यावरून राजेंद्र गलाणी यांच्या विरोधात भांदवि कलम 308, 278 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com