धुळ्यात पलायन करतांना कैद्याची विहिरीत उडी

पोलिसांनी विहिरीबाहेर काढून घेतले ताब्यात; शहर पोलिसात गुन्हा
धुळ्यात पलायन करतांना कैद्याची विहिरीत उडी

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरात काल एका माथेफिरूने एटीएमची तोडफोड केल्याची घटना ताजी असतांना आज दुपारी जिजामाता विद्यालयातील तात्पुरत्या कारागृहातील एक कैदी कारागृह पोलिसांच्या हातून निसटला.

पोलिसांनीही त्याचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर त्याने थेट एका विहिरीत उडी मारली. पोलिसांनी त्याला बाहेर काढून ताब्यात घेतले. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील जिजामाता कन्या विद्यालय मुलींच्या वसतीगृहात तात्पुरते कारागृह तयार करण्यात आले. त्यात मोहाडी पोलिसात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आसिफ शाह अजीज शाह (रा. सरदार हॉटेलसमोर शंभर फूटी रोड, धुळे) याला दि. 7 सप्टेंबरपासून ठेवण्यात आले आहे.

आज दुपारी एक वाजेच्या सुमारास कन्या विद्यालयाजवळील कचरा कुंडीजवळ कचर्‍याचे बॅकेट घेवून जात असतांना असिफ याने कारागृह कर्मचारी चंद्रकांत निकुंभे यांच्या हाताला झटका देवून झटापट करून कारागृहाच्या प्रवेशव्दारामधुन पळ काढला. त्यानंतर गरूड कॉम्पलेक्समधील तळमजल्याच्या अंधारात लपून बसला.

त्यानंतर कारागृह पोलिसांनी त्यांच्या शोध सुरू केला. त्याने रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीत उडी मारली. त्यामुळे एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने कैद्याला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात आणण्यात आले.

याप्रकरणी चंद्रकात निकुंभे यांच्या फिर्यादीवरून कारागृहातून पळुन जावून विहिरीत उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आसिफ शाह यांच्याविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या तात्पुरत्या कारागृहात यापुर्वी देखील तीन ते चार कैद्यांनी पळ काढला होता. नंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com