धुळे - Dhule - प्रतिनिधी :

पुणे येथे पोहोचविण्यासाठी दिलेल्या 12 लाखांच्या सरकी रिफाइंड तेलाचे डबे रस्त्यात उतरवुन त्यांची परस्पर विक्री केल्याप्रकरणी ट्रक मालकासह तिघांवर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत विनायक लक्ष्मण कुलकर्णी (वय 50 रा. श्री हरी अपार्टमेंट कॉलनी, लेवा भवन, देवपूर) यांनी पोलिसात फिर्यादी दिली आहे.

त्यानुसार संजय सोया प्रा.लि, या कंपनीतून पुणे येथील चिमणलाल गोविंददास यांना सरकी रिफाईन तेलाचे 15 पत्रटी 700 डबे असा 12 लाख 19 हजार 616 रूपये किंमतीचा माल ट्रकमध्ये (क्र. एमएच 18 बीजी 7588) पाठविला होता.

पंरतू ट्रक मालक सुनिल युवराज पाटील रा. अवधान, चालक भुषण नानाभाऊ गर्दे रा. सत्यबाई कॉलनी, लक्ष्मी नगर, साक्री रोड, धुळे व संतोष अशोक गवळी रा. बोरविहीर ता. धुळे या तिघांनी हा माल पुणे येथे संबंधीत व्यक्तीकडे न पोहोचविता.

प्रवासात कोठे तरी उतरवून विक्री केला. हा प्रकार दि. 29 ते 30 जानेवारी दरम्यान घडला. वरील तिघांनी संगणमत करून कंपनीची आर्थिक फसवूणक केली.

त्यानुसार वरील तिघांवर मोहाडी पोलिसात भादंवि कलम 420, 406, 407, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि राजगुरू करीत आहेत.