धुळे - Dhule - प्रतिनिधी :

अफगाणिस्थानातील घबाडाच्या लालसेपायी देवपूरातील शिक्षकांची सव्वातील लाखात फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात इल्स मिचेल व गरिमा देशमुख नामक दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहरातील देवपुर परिसरातील वलवाडी शिवारातील गुरव हौसिंग सोसायटीतील प्लॉट क्र. 6 मध्ये राहणारे शिक्षक संजय शेनपडू देसले (वय 47) यांनी सायबर पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार इल्स मिचेल हिने देसले यांच्याशी ई-मेलव्दारे वेळोवळी संपर्क साधला. मी अफगाणिस्थान येथे सैन्य दलाल भरती झालेली आहे.

आम्हाला अफगाणिस्तान येथे घबाड सापडले आहे. त्यात आमच्या हिश्याला 4.3 मिलियन डॉलर आले आहेत. आमच्या हिश्यातील 30 टक्के रक्कम आम्ही पाठवितो, असे सांगितले.

त्यानंतर एक बॉक्समध्ये पार्सल पॅक करून ब्रिटिश एअरवेज,वर्ल्ड कार्गो या कंपनीमार्फत बॉक्स कुरियर केल्याच्या पावतीचा फोटो व त्यात नोटांचे बंडल पॅक करतांनाचे व्हिडीओ संजय देसले यांच्या ईमेलवर पाठविण्यात आले.

त्यांनतर गरिमा देशमुख हिने मी, मुंबई येथील कस्टम अधिकारी बोलत असून तुमच्या नावाने अफगाणिस्तानमधून एक पार्सल आले आहे. ते सोडविण्यासाठी व पैशाचे आमिष दाखवून 3 लाख 27 हजार रुपये बँकेत भरा करा, असे तिने सांगितले.

त्यानुसार देसले यांनी रक्कम भरली. मात्र पार्सल मिळाले नाही. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर देसले यांनी सायबर पोलिस ठाणे गाठले.

त्यानुसार इलियास मायकेल, गरिमा देशमुख या दोघांविरुध्द भादंवि कलम 419,420,34,आयटी अॅक्ट 66 (डी) प्रमाणे आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख करीत आहेत.