धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील गरुड बागेतील साडेसात लाखांच्या घरफोडीची उकल करण्यास शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे एका अल्पवयीन मुलाच्या माध्यमातून ही चोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे. यासाठी त्याला कुत्र्याचे आमिष दाखविण्यात आल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांनी पत्रकारपरिषदेत दिली.

शहरातील गरूड बागेतील ग.स.बँके शेजारी असलेल्या शुभम करोती निवास येथे राहणार्या चंद्रजित उदय सिसोदे (वय 30) यांच्या घराच्या दुसर्या मजल्यावरील उघड्या बेडमरूमध्ये प्रवेश करून अज्ञात चोरट्याने 7 लाख 40 हजार रुपये किंमतीचे सोने व मोत्याचे दागिने लंपास केले होते.

याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असतांना ही चोरी गरुड बाग परिसरात राहणार्या एका अल्पवयीन बालकाच्या मदतीने झाल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली.

त्यानुसार शोध पथकाने संशयित बालकाला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या पालकांनादेखील विश्वासात घेतले. चौकशीत त्या बालकाने गणेश अनिल मरसाळे (रा.रमाबाई आंबेडकर नगर, देवपूर, धुळे) याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यावरून शहर पोलिसांच्या पथकाने गणेश मरसाळे याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून आणि त्या बालकाकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत कण्यात आला. त्यात 50 हजार रुपये किंमतीचा 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा चारपदरी मोत्याचा हार, 50 हजार रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र असलेली पोत, 50 हजार रुपये किंमतीची 1 तोळे वजनाचा सोन्याचा हार, 25 हजार रुपये किमतीचे 5 ग्रॅमचे झुमके, 1 लाख रुपये किंमतीचे हिरेजडीत स्टॉप्स, 25 हजार रुपये किंमतीचे कर्णफुले, 25 हजार रुपये किंमतीची हिरेजडीत अंगठी, 40 हजार रुपये किंमतीचा डायमंड असलेला कानातील टॉपचा जोड, 1 लाख 75 हजार रुपये किंमतीच्या 35 गॅ्रम वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या, 2 लाख रुपये किमतीचा डायमंडचा आणि मोत्यांचा हार यांचा समावेश आहे.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, एपीआय श्रीकांत पाटील, पीएसआय आखाडे, बैरागी, हे.कॉ.भिकाजी पाटील, पोना मुख्तार मन्सुरी, सतीश कोठावदे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, संदीप पाटील, रवी गिरासे, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, राहुल पाटील, राहुल गिरी, अविनाश कराड, तुषार मोरे, प्रसाद वाघ, विवेक साळुंके यांनी केली.

कुत्र्याच्या मोहामुळे चोरीचे धाडस, समुपदेशन करणार

संशयीत गणेश मरसाळेला पोलिसांनी अटक केली आहे. गणेशकडे कुत्रं असल्याने त्या कुत्र्याच्या मोहापायी त्या बालकाने गणेशच्या मदतीने चोरीचे धाडस केले. गुन्ह्यातील अल्पवयीन बालक हा सर्वसामान्य कुटुंबातील आहे.

पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित गुन्ह्यातील अल्पवयीन बालकाचे समुपदेशन आणि पुनर्वसनाबाबत पोलिस निरीक्षक देशमुख यांना मार्गदर्शन करुन आदेशीत केले असल्याची माहिती अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली.