धुळ्यात शाखा अभियंत्याकडे भरदिवसा घरफोडी

धुळ्यात शाखा अभियंत्याकडे भरदिवसा घरफोडी

रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरासह जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच आहे. देवपूरातील नंदनवन बँक कॉलनीत भरदिवसा शाखा अभियंताचे घर फोडून चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्यांच्या दागिने असा लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. या घटनामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पश्चिम पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नंदनवन बँक कॉलनीतील सिस्टेल हायस्कूल जवळ प्लॉट नंबर 36/ब मध्ये शाखा अभियंता राजेश हिरालाल चौधरी हे राहतात. ते काही कामानिमित्त गावात गेले होते.

ही संधी साधत दुपारी बारा ते दोन वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा, कुलूप तोडून घरात शिरकाव केला. घरातील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करीत कपाटातून 20 ते 25 हजार रुपयांची रोकड तसेच देवार्‍यातील महालक्ष्मीचे एक तोळ्याचे सोन्याचे नाणे, चांदीचे ताट असा मुद्देमाल लंपास केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस कर्मचारी मुक्तार शेख, सुनील राठोड, परशुराम पवार, अमोल रामराजे यांनी याबाबत पंचनामा केला. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान शहरात चोरीचे प्रमाण वाढतच आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com