युपीतून एकाला अटक; टँकर चालकाच्या खूनाचा उलगडा

युपीतून एकाला अटक; टँकर चालकाच्या खूनाचा उलगडा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात आढळून आलेल्या टँकर चालकाच्या खूनाचा उलगडा करण्यास तालुका पोलिसांना यश आले आहे. तालुका पोलिसांनी वेषांतर करून उत्तरप्रदेशातून एकाला शिताफिने अटक केली.

तसेच त्यांच्या दोघ साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे. संशयीताने टँकरमधील गॅसची विक्री करण्यासाठी कट रचून खुन केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

मुंबई ते आग्रा महामार्गावरील धुळे तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात दि. 29 जुन रोजी रुईच्या माथ्यावर शिवशक्ती हॉटेल ते शिवसाई हॉटेल दरम्यान मध्यभागी गवतात एकाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासात मयताचे नाव मिर्झा आझाद बेग (वय 30) असे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित दोन संशयीत आरोपींची नावे निष्पन्न केली.

सपोनि प्रशांत गोरावडे, हवालदार प्रविण पाटील, नितीन दिवसे, अमोल कापसे यांंच्या पथकाने उत्तरप्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील उडैयाडीह गाव गाठले.

वेष बदलून ट्रक चलक नफीस अहमद मोहम्मद इशा (वय 35 रा. ग्राम पतुलकी, पोस्ट सेतापुर, थाना अन्तू, जि. प्रतापगढ) याला अटक केली. तर इकबाल याकुब शेख (वय 47 वर्षे, ख्वाजा गरीब नगर, नसीराबाद, ता. भुसावळ, जि.जळगाव) व इम्तीयाज मोहम्मद रहमान अब्दुल हमीद सी एम (रा. श्री बालाजी गॅस पंप, पारोळा चौफुलीजवळ, धुळे) यांना ताब्यात घेतले आहे.

गॅस विक्रीचा रचला कट

मयत मिर्झा आझाद बेग हा हरशरनसिंग भाटीया यांच्या गॅस टँकरवर (क्र. एमएच 04 एच एस 1289) चालक म्हणुन काम करत होता. त्याच गॅस टँकरवर पुर्वी काम केलेला अटकेतील नफीस अहमद मोहम्मद इशा व क्लीनर इम्रान खान उर्फ नौशाद अली हे दि 29 जुलै रोजी मयतासोबत टँकरमध्ये बसून सुट्टीवर राहते गावी जाण्यासाठी निघाले.

प्रवासादरम्यान संशयीत आरोपींनी इगतपुरी येथे दारु प्राशन केली. त्यानंतर टँकर चालकाचा खून करुन टँकरमधील गॅस विक्री करण्याच कट रचला.

असा केला खून

संशयीत आरोपींनी मालेगावच्या पुढे टँकर आल्यानंतर मयत चालकाला टँकर थांबवायला लावला. त्यानंतर टँकर चालकाशी वाद उकरुन काढला. त्यांची एकमेकांशी शिवीगाळ चालू होती. टँकर चालक टँकर चालू करण्यापुर्वी चालकाच्या बाजूचा आरसा कागदाने पुसत असतांना इम्रान खान ऊर्फ नौशाद अली याने टँकरच्या कॅबीनमध्ये असलेल्या टुलबॉक्समधील व्हील पान्हा बेसावध चालकाच्या डोक्यावर मारला.

तर नफीस अहमद मोहम्मद इशा याने गळ्यातील बागायती रुमालाने पिळ घालत मयत चालकाचा गळा आवळला.

मृतदेह फेकला पुरमेपाड्यात

चालक मयत झाल्यानंतर त्याचा मृतदेह कॅबीनमध्ये एका बाजूला ठेवून नफिस अहमद मोहम्मद इशा याने याने ट्रॅकर चालवायला सुरूवात केली. त्यानंतर मृतदेह पुरमेपाडा शिवारात रस्त्यच्याकडेला फेकून दिला. पुढे दोघांनी टॅकरमधील 5 हजार 50 किलो गॅस परस्पर विक्री केला. पंप मॅनेजरकडून 1 लाख 30 हजार रूपये घेवून टँकर चाळीसगाव रोडवरील माडगुळकर पंप येथे उभा केला.

त्यानंतर दोघे दुसर्‍या टँकरमध्ये बसून चाळीसगाव चौफुली येथे आले. तेथून खाजगी बसव्दारे इंदूरपर्यंत एकत्र गेले. तेथून दोघे वेगवेगळ्या मार्गाने निघून गेले. तालुका पोलिसांनी पंधरा दिवसात हा गुन्हा उघडकीस आणला.

पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, एसडीपीओ प्रदीप मैराळे याच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी ही कामगिरी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com