कपाटाची चावी बनविण्यासाठी कपाटच साफ करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

कपाटाची चावी बनविण्यासाठी कपाटच साफ करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

कपाटाची चावी बनविण्याच्या बहाण्याने घरात शिरुन चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने केला.

दि. 4 जुलै 2021 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास राहुल हिरामण भामरे, रा. खोरी ता. साक्री यांच्या राहत्या घरात कपाटाचे कुलूप दुरूस्त करण्यासाठी आलेल्या दोन व्यक्तींनी कपाटात ठेवलेले 52 हजार 710 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व 17 हजार रुपये रोख असे एकुण 69 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

याबाबत निजामपूर पोलीस ठाण्यात भादंवि 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे देण्यात आला.

पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना सदर गुन्हा नंदुरबार येथील एकतानगर भागात राहणारे सराईत गुन्हेगार सुतारसींग जलसींग शिकलीकर व पातालसींग दिलीपसींग शिकलीकर यांनी केला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पथक तयार केले.

पथक दि. 14 जुलै रोजी नंदुरबार येथे जावून संशयित सुतारसींग जलसींग शिकलीकर, रा. एकतानगर, नंदुरबार यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार पातालसींग दिलीपींग शिकलीकर याच्या मदतीने केल्याची कबुल दिली.

त्यानंतर त्याच्याकडून 8110 रुपये किंमतीचे 4.700 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, 44 हजार 600 रुपये किंमतीचे 31.500 ग्रॅम वजनाचे सोन्याची पोत, 35 हजार रुपये किंमतीची 10.800 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असा एकूण 87 हजार 710 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सुतारसींग जलसींग शिकलीकर याच्याकडे चौकशी केली असता दोघा संशयितांनी सोन्याचे दागिने हे निजामपुर येथुन व सोन्याची चैन अमरावती येथुन पातालसींग दिलीपसींग शिकलीकर याच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले.

संशयित सुतारसींग शिकलीकर याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर पातालसींग दिलीपसींग शिकलीकर याचा शोध पोलीस घेत आहेत.

संशयित हे सराईत गुन्हेगार असल्याने अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोऊनि योगेश राऊत, पोहेकॉ रफीक पठाण, श्रीकांत पाटील, संदिप थोरात, संजय पाटील, पोना गौतम सपकाळे, राहुल सानप, सुनील पाटील, दीपक सुभाष पाटील यांच्या पथकाने केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com