ट्रॅक्टर-ट्रॉली चोरणारी टोळी गजाआड

ट्रॅक्टर-ट्रॉली चोरणारी टोळी गजाआड

दोन लाखांचा मुद्येमाल हस्तगत, एलसीबीची कामगिरी

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातून ट्रॅक्टर व ट्रॉली चोरणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून ट्रॅक्टरसह ट्रॉली, लोखंडी जाळी असा एकुण दोन लाखांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अरविंद नागोसिंग राजपूत (रा.ओम नगर, देवपुर) यांनी त्यांचा हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर बिलाडी फाट्याच्या उड्डाण पुलावर दि. 1 मे रोजी उभा केला असता तो अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला आहे. याप्रकरणी देवपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा संयुक्त तपास करीत असतांना हा गुन्हा सागर युवराज पाटील (रा.ढंडाणे ता.धुळे) व अविनाश बन्सीलाल परदेशी (रा. देवपुर) यांच्यासह त्यांच्या साथीदाराने केला असल्याची माहिती आज दि. 25 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

त्यानुसार एलसीबीच्या पथकाने शोध घेवुन वरील दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. त्यांच्याकडून 1 लाख 25 हजार रूपये किंमतीचे ट्रॅक्टर, 30 हजारांची ट्रॉली व 50 हजार रूपये किंमतीची कंपाऊडसाठी वापरण्यात येणारी लोखंडी जाळी जप्त करण्यात आली.

दरम्यान देवपुर पोलिसात दाखल ट्रॅक्टर चोरी व पश्चिम देवपुर पोलिस ठाण्यातील ट्रॉली चोरी असे दोन्ही गुन्हे आरोपींकडून उघडकीस आणण्यात आले आहेत. आरोपींकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यांना पुढील कारवाईसाठी देवपुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पीएसआय योगेश राऊत, सुशांत वळवी, पोहेकॉ महेंद्र कापुरे, पोना कृणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, पोकाँ विशाल पाटील, महेश मराठे, संदीप सरग यांच्या पथकाने केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com