सामोडे येथे एकाच रात्री तीन घरफोड्या

सामोडे येथे एकाच रात्री तीन घरफोड्या

पिंपळनेर - Pimpalner - वार्ताहर :

सामोडे (ता. साक्री) येथील जुन्या गाव या भागात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी केली. घटनेमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चोरट्यांनी प्रथम जुन्या गाव भागातील संजय शांताराम घरटे यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटीतील कपडे व साहित्य अस्ताव्यस्त करून घराची संपूर्ण छाननी केली. पत्र्याच्या कोठीत खत बियाणे घेण्यासाठी ठेवलेली 30 हजारांची रोकड लंपास केली.

दरम्यान त्यांच्या घरासमोर राहणारे राजेंद्र घरटे हे पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घराचा दरवाजा उघडला. तेव्हा त्यांना दोन चोरटे मोटरसायकलने पळ काढतांना दिसले. त्यानंतर त्यांनी समोरचा संजय घरटे यांच्या घराचे दरवाजे उघडे दिसल्याने तिथे जाऊन चौकशी केली असता घरात चोरी झाल्याचे दिसले.

याबाबत त्यांनी दवाखान्यात गेलेल्या संजय घरटे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. अधिक चौकशी केली असता त्याचवेळी गल्लीतील कै.दामोदर रघुनाथ घरटे यांच्याकडे चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून साहित्य अस्ताव्यस्त केले. परंतू बर्‍याच दिवसांपासून घरी कोणी राहत नसल्याने चोरट्यांना काहीही ऐवज मिळाला नाही. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बाजूच्या गल्लीतील अशोक विनायक घरटे यांच्या घरकडे वळविला.

त्यांच्या घराला एक कुलूप व दुसरे इनलॉक असे दोन लॉक होते. त्यांनी पहिले कुलूप तोडून, इनलॉक उघडण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते अपयशी ठरले. त्यांनी तिथून पळ काढला. या गल्लीतील नागरिकांचे म्हणणे आहे की, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या गल्लीत लाईट नाही. वारंवार तक्रार करूनही गल्लीत पथदिवे लावले गेले नाहीत. अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी चोरी केली.

घटनेची माहिती पिंपळनेर मिळताच पीएसआय केदारे व पोकॉ कोकणी, वाघ यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com