पिंपळनेरात एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोडी

दहा तोळे सोन्यासह रोकड लंपास
पिंपळनेरात एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोडी

पिंपळनेर - Pimpalner - वार्ताहर :

येथील अलंकापुरी नगर व भाग्योदय कॉलनीत एका रात्रीतून चोरट्यांनी पाच बंगले फोडत पोलिसांना तपासाचे खुले आव्हान दिले आहे.

सेवानिवृत्त शिक्षक हिंमतराव गायकवाड यांच्या बंगल्यातून दहा तोळे सोने व 35 हजारांची रोकड लंपास केली. तर दोन बंगल्यात किरकोळ रक्कम चोरीस गेली. तर दोन बंगल्यात चोरट्यांनी निराशा झाली.

अलंकापुरी नगर व भाग्योदय कॉलनी काल रात्री दीड ते अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात तीन चोरांनी प्रवेश केला. सेवानिवृत्त शिक्षक हिंमतराव बाबुराव गायकवाड हे सहपरिवार साक्री येथे कार्यक्रमासाठी गेलेले होते. त्यामुळे त्यांचा बंगला बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.

घरातील सर्वत्र कपाटे तोडून त्यातून दहा तोळे सोने व 35 हजार रुपये रोख चोरून नेले. तर या बंगल्यापासून जवळच बसलेल्या गुरुकृपा किराणा दुकान फोडून गल्यातील तीनशे ते चारशे रुपयांची चिल्लर चोरून नेली. त्यानंतर चोरट्यांनी जवळील उमेश जयराम खर्डे यांच्या शकुंतला बंगल्यावर मोर्चा वळविला.

घरमालक घरात झोपलेले असतांना आत प्रवेश केला. भिंतीवर टांगलेल्या पॅन्टच्या खिशातील पैस काढून पसार झाले. सकाळी जाग आल्यावर उमेश घरटे यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. दरम्यान त्यानंतर चोरट्यांनी कॉलनीतील प्रेमचंद प्रकाश शुक्ला यांच्या घराकडे लक्ष वळविले. मात्र त्यांचा प्रयत्न फसला.

घराच्या मागून चढतांना भिंतीची वीट पडल्याने आवाज झाला. त्यामुळे शुक्ला यांची सून उठल्याने चोर पळाले. त्यानंतर चोरांनी जवळच असलेल्या अलंकापुरी नगरातील हेमंत प्रभाकर सोनवणे यांच्या बंगल्याचा कडी-कोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न केला. सोनवणे हे दीड वाजेला सुकापुर येथे ड्युटीला निघाले होते. तर त्यांची पत्नी दरवाजा लावून नुकत्याच झोपल्या होत्या.

मात्र त्यांना दरवाजाची कडी तोडण्याचा आवाज आला. त्यांनी बाजूच्या खिडकीतून पाहिले असता तीन चोर दिसले. त्यांनी लगेचच पतीला फोन केला. ते तत्काळ परतले. चोरांना सुगावा लागल्याने तेथून पसार झाले. यानंतर चोरट्यांनी जवळच असलेल्या महिपत महाजन व दत्तात्रय महाजन यांच्या शेतातील बंगल्याकडे मोर्चा वळविला.

मात्र घरातील लोकांची चाहुल लागल्याने चोरटे तेथूनही रिकाम्या हाती पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. अज्ञात चोरांविरुद्ध पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com