28 लाखांचा दारु व बिअरसाठा जप्त

28 लाखांचा दारु व बिअरसाठा जप्त

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

सटाणा-पिंपळनेर रोडवर पिंपळनेरपासून 4 किमी अंतरावर ट्रकमधून बेकायदेशीर दारु, बिअर साठा आणि ट्रक असा 28 लाख 16 हजार 320 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेच्या पथकाने केली आहे.

बेकायदेशीररित्या विदेशी दारु ट्रकमधून सटाणा-पिंपळनेर मार्गाने गुजरात राज्यात जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली.

या माहितीच्या आधारे सटाणा-पिंपळनेर रस्त्यावर सापळा लावला असता पिंपळनेरपासून 4 किमी अंतरावर हॉटेल सरकारसमोर सटाणाकडून पिंपळनेरकडे जाणार्‍या वाहनांची तपासणी केली असता आज पहाटे 3.45 वाजता एमपी 09 एचजे 6677 क्रमांकाची ट्रक पिंपळनेरकडे जातांना आढळून आली.

या गाडीचा चालक रुपेंद्रसिंग बनेरसिंग जाधव रा. इंदूर आणि सहचालक अमन महेंद्र राठोड रा. इंदूर यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ट्रकमध्ये प्लॅस्टीक स्क्रॅप असल्याचे सांगून मालाची बिल्टी पोलिसांना दिली.

परंतू ट्रक संशयास्पद वाटत असल्यामुळे ट्रकची तपासणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये पाठीमागे साईडला कचरा भरल्याचे दिसून आले. त्या कचर्‍यामध्ये दारु व बिअरचे बॉक्स लपवून ठेवले होते. या ठिकाणाहून दारु व ट्रक असा 28 लाख 16 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

रुपेंद्रसिंग जाधव आणि अमन राठोड यांच्याविरुध्द पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोहेकॉ रवींद्र माळी, हेकॉ संजय पाटील, संदीप पाटील, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रवीकिरण राठोड, विशाल पाटील, मनोज बागुल, मनोज महाजन यांच्या पथकाने केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com