वाणी समाजाने घडविले एकीचे दर्शन,12 लाखांची मदत

वाणी समाजाने घडविले एकीचे दर्शन,12 लाखांची मदत

करोनात बळी गेलेल्या माकडे कुटुंबातील दोघांना दिली प्रेमाची ऊब

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

घरातील कर्त्या पुरुषाला कोरोनाची बाधा झाली. पहाता-पहाता त्यांची पत्नीही यात ओढली गेली. आणि निष्ठूर कोरोनाने दोघांचाही बळी घेतला.

आधीच गरीबी त्यात उघड्यावर आलेली दोन्ही लेकरे. यामुळे वाणी समाजातील काही मंडळींनी पुढाकार घेत तब्बल 12 लाखांची मदत एकत्रित केली. समाजाने खर्‍या अर्थाने एकीचे दर्शन घडविले.

करोना महामारीमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झालीत, अनेकांचा आधार कोलमडला, काही बालकांचे आईवडील मृत्युमुखी पडलेत. अशीच एक हृदयद्रावक घटना धुळे शहरात वाणी समाजात घडली. दि. 24 एप्रिल रोजी शहरातील एक पतसंस्थेत काम करणार्‍या व आपल्या पत्नीसहित पिग्मी एजंटचे काम करणार्‍या गोकुळ माकडे व जयमाला माकडे या दाम्पत्याचा कोरोनामुळे एक दिवसाआड मृत्यू झाला.

दैनंदिन काम करून उदरनिर्वाह करणार्‍या परिवारातील दोघेही मयत झाल्याने त्यांचा मुलगा व मुलगी दोन्ही निराधार झालीत. या दुःखद घटनेमुळे धुळे शहरातील वाणी समाज शोकमग्न झाला. या निराधार बालकांचे समाजाने दायित्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

यात राजेंद्र चितोडकर, मोहन येवले, दिलीप पाखले, गजानन कोतकर, नाना वाणी, दिगंबर सोंजे व मुकेश पिंगळे यांनी पुढाकार घेतला. सहायता समितीच्या माध्यमातून संपुर्ण वाणी समाजास आर्थिक मदतीचे आवाहन केले. समितीच्या आवाहनास शहरासह शिरपूर, नंदुरबार, तळोदा, शहादा साक्री, पारोळा, 40गाव, सटाणा, धरणगाव, नासिक मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली तसेच गुजरात, दीव दमण, आदी ठिकाणाहून मदतीचा हात मिळाला. समस्त समाजाच्या वतीने जवळपास 12 लाखाचा निधी जमा झाला. निधी बालकांकडे सुपूर्द झाला असून अजूनही मदतीचा ओघ सुरूच आहे.

प्राजक्ता व चैतन्य यांना भविष्यातील त्यांच्या शैक्षणीक व कौटुंबीक अडीअडचणी सोडविण्यासाठी सहायता समितीच्या वतीने सहकार्याचा हात राहणार आहे. मुलांना शासनाच्या योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार आहे.

समाज एकीचे आदर्श उदारहण यानिमित्ताने पाहायला मिळाले. वाढदिवस साजरा न करता चिमुकल्यांनी देखील यात खारीचा वाटा उचलला. यासाठी पुढाकार घेणार्‍या सहाय्यता समितिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com