जिल्ह्यातून दररोज 5 हजार चाचण्या कराव्यात !

जिल्हाधिकारी संजय यादव यांचे करोना विषाणू आढावा बैठकीत निर्देश
जिल्ह्यातून दररोज 5 हजार चाचण्या कराव्यात !

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दररोज किमान पाच हजार चाचण्या करताना बाधित रुग्णाच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींच्या चाचण्या कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महापालिकेचे आयुक्त अजिज शेख, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे , डॉ. विक्रम बांदल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, डॉ. दीपक शेजवळ, डॉ. महेश मोरे, डॉ. विशाल पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा पॉझिटिव्हीटी दर कमी होईल, असे नियोजन करावे. लसीकरण केंद्रावर येणार्‍या व्यक्तीजवळ त्याचा अलिकडील अहवाल करोना निगेटिव्ह नसेल, तर अशा व्यक्तीची चाचणी करावी. यामुळे करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यास मदत होईल.

करोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेत रुग्ण संख्या कमी होताना दिसत असली, तरी आरोग्य यंत्रणेने सतर्क रहाणे आवश्यक आहे. याबरोबरच संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी आतापासूनच पायाभूत सोयीसुविधांच्या निर्मितीवर भर द्यावा. त्यासाठी आवश्यक निधीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत.

जिल्ह्यात आमदार निधी, सामाजिक दायीत्व निधी आणि डीआरडीओ यांच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्यांची प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करीत ते कार्यान्वित करावेत.

पन्नास पेक्षा अधिक खाटा असलेल्या खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी महानगरपालिकेने पाठपुरावा करावा. साक्री व पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करतानाच कोविड 19 करीता खाटांची संख्या वाढवावी. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रक सादर करावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिल्या. कोरोना विषाणूचे लवकर निदान होवून रुग्ण औषधोपचारासाठी रुग्णालयात लवकर आला पाहिजे.

त्यासाठी गाव पातळीवरील आपत्ती निवारण समितीच्या सदस्यांना सक्रिय करावे. या समिती सदस्यांच्या माध्यमातून गावागावांत जनजागृती करावी. संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी मनुष्यबळाचे नियोजन करावे. नियुक्ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करीत आवश्यक त्या अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षणाचे नियोजन करावे.

करोना विषाणूबाधित प्रत्येक रुग्णांच्या बिलाचे लेखापरीक्षण तातडीने पूर्ण करावे. तसेच प्लाझ्माच्या शासन दराबाबत प्रत्येक रक्तपेढीत फलक लावावेत, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी कोरोना प्रतिबंधासाठी करावयाच्या उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com