कोविड प्रतिबंधक लसीकरण गतीमान करा !

आ. कुणाल पाटील यांची वैद्यकीय अधिकार्‍यांना सूचना
कोविड प्रतिबंधक लसीकरण गतीमान करा !

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

धुळे शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. करोनापासून जनतेचे रक्षण व्हावे म्हणून आरोग्य विभागाने कोविड लसीकरण प्रभावी आणि गतीमान पध्दतीने राबवावे, अशा सूचना आ.कुणाल पाटील यांनी दिल्या.

दरम्यान, कोरोना काळात रुग्णांना उपयोगी पडावी म्हणून आमदार निधीतून घेण्यात येणार्‍या अ‍ॅम्ब्यूलन्स खरेदी प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवून त्या खरेदी कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या.

करोना लसीकरणाबाबत अजूनही ग्रामीण भागात गैरसमज आहेत. मात्र ही लस सुरक्षित असून सर्वांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहनही आ.कुणाल पाटील यांनी केले.

जिल्हा व धुळे ग्रामीणमधील वैद्यकिय अधिकार्‍यांची बैठक महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष व आ. कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, धुळे तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तरन्नुम पटेल, 11 प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आ.कुणाल पाटील यांनी जिल्हा आणि धुळे तालुक्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. व करोनाग्रस्तांवर हलगर्जी पणा न करता उपचार करुन त्यांना तंदुरस्त करण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांनी अहोरात्र काम करण्याच्या सूचना दिल्या.

डॉक्टर तसेच सहयोगी कर्मचार्‍यांची संख्या कमी पडत असून त्यांची संख्या वाढविण्यासाठी त्वरीत शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही आ.कुणाल पाटील यांनी सांगितले.

धुळे तालुक्यातील 10 गावे धुळे महापालिकेत समाविष्ट झाल्याने त्या गावातील रहिवाशांनाही प्राथमिक आरोग्य केंद्र आणि महापालिका रुग्णालयात लसीकरण करण्यात यावे.

त्यांना फिरवा फिरवी होणार नाही याची काळजी आरोग्य कर्मचार्‍यांनी घ्यावी. बैठकीत आ.कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यात आतापर्यंत झालेल्या लसीकरणाबाबत आढावा घेतला. त्यात धुळे तालुक्यातील 11 प्राथमिक केंद्रात एकूण 29 हजार 419 जणांना आतापर्यंत लसीकरण झालेले आहे.

पुढील काळात शासनाकडून लसींचा पुरवठा वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून जास्तीत जास्त लोकांना लस देण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करण्याच्याही सूचना आ.पाटील यांनी दिल्या.

यावेळी झालेल्या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तरन्नूम पटेल, धुळे मनपा वैद्यकिय अधिकारी डॉ.पल्लवी रवंदळे, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, मुख्य प्रशासक रितेश पाटील, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, साहेबराव खैरनार, पं.स.गटनेते पंढरीनाथ पाटील, काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष अशोक सुडके, वलवाडी माजी सरपंच भटू चौधरी, संचालक संतोष राजपूत, बापू खैरनार, पं.स.सदस्य गणेश जयस्वाल, रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते.

अकरा अ‍ॅॅम्ब्यूलन्स खरेदी प्रस्ताव

आ.कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार निधीतून कोविड काळात रुग्णांना उपयोगी पडावी म्हणून अ‍ॅम्ब्यूलन्स खरेदीचा निर्णय घेतला. त्यानुसार तालुक्यात एकूण 11 प्राथमिक आरोग्य केंद्र असून तेवढ्या अ‍ॅॅम्ब्यूलन्स खरेदीचा प्रस्ताव तातडीने तयार करुन शासनाला पाठवावा आणि लवकरात लवकर अ‍ॅॅम्ब्यूलन्स खरेदी करण्याच्याही सूचना जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना दिल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com