...तर करोना महामारी वाढेल

मनपा स्थायी समितीत सदस्यांनी व्यक्त केली चिंता , लसीकरणाबाबत नियोजन करा
...तर करोना महामारी वाढेल

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

महापालिकेतर्फे सुरु करण्यात आलेल्या काविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रांवर महापालिकेच्या नियोजना अभावी गर्दी होत आहे.

यामुळे करोनाचे रुग्ण वाढण्याची भिती आहे. याबद्दल स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी चिंता व्यक्त केली व लसीकरणासाठी योग्य ते नियोजन करावे अशी मागणी केली.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी उपायुक्त शिल्पा नाईक, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ, अमोल मासुळे, शितल नवले, बन्सीलाल जाधव, सुनिल बैसाणे, कमलेश देवरे, नागसेन बोरसे, अमीन पटेल, हिना पठाण, भारती माळी, किरण कुलेवार आदी उपस्थित होते.

लसीकरण केंद्र सुरु झाले आहे. परंतु याठिकाणी दररोज शंभर लस उपलब्ध होत आहेत. तर लस घेण्यासाठी सातशे ते आठशे जणांची गर्दी होते.

काही वेळेला या गर्दीत हाणामारीही होते. त्यामुळे महापालिकेने नियोजन करावे, अशी सूचना अमोल मासोळे यांनी केली. काही रुग्ण वाहिकेकडून नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याची तक्रारही त्यांनी यावेळी केली.

लसीकरण केंद्रावर गर्दी होत असल्याची तक्रार किरण कुलेवार यांनीही केली. याबाबत डॉ.मोरे यांच्याशी संपर्क केल्यावर ते उडवा उडवीचे उत्तरे देतात असा आरोपही त्यांनी केला.

यावर डॉ.मोरे म्हणाले की, आपल्याकडे लस कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे सर्व केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु ठेवता येणार नाही.

लसीकरणासाठी अगोदर अ‍ॅपवर नोंदणी करावी. 90 टक्के नागरिक नोंदणी न करता केंद्रावर येतात. त्यामुळे गर्दी होते, असे डॉ.मोरे यांनी सांगितले.

महापालिकेच्या फाईल चोरीला जातात हा प्रकार गंभीर असून याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी, अशी सूचना सुनिल बैसाणे यांनी केली. प्रभाग 7 मध्ये दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत 16 कोटींची कामे मंजुर केली होती.

त्यातून रस्त्यांचे काम करण्याचे नियोजन होते. परंतु सदर कामाची फाईलच महापालिकेतून गहाळ झाली. असा आरोप बैसाणे यांनी केला.

महापालिकेतून फाईल गहाळ होते तर अधिकारी व कर्मचारी करतात काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावर सभापती जाधव यांनी फाईल जमा केल्यानंतर नोंदी ठेवाव्यात तसेच फाईल गहाळ प्रकरणी अधिकार्‍यांनी पोलीसात तक्रार द्यावी, असे त्यांनी सांगितले.

मुस्लिम बहुल भागात डायरियाची साथ पसरली असून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहींना बिपीसह किडनी फेल होण्याचा त्रासही जाणवत आहे. अशी तक्रार अमिन पटेल यांनी केली.

तक्रारीनंतर या भागातील पाण्याचे नमूने घेतले. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शहरासह अनेक भागात दुषीत पाणीपुरवठा होत आहे. त्याचे व्हिडीओ व फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशी तक्रार शितल नवले व भारती माळी यांनी केली. याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com