सर्वाधिक रुग्ण आढळणार्‍या गावांमध्ये सर्वेक्षण करा

आढावा बैठकीत जिल्हाधिकारी संजय यादव यांची सूचना

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यातील काही गावांमध्ये कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा गावांमध्ये आरोग्य विभागाने अभियानस्तरावर घरोघरी तपासणी मोहीम राबवावी.

त्याबरोबरच संभाव्य तिसर्‍या लाटेची पूर्वतयारी आतापासूनच सुरू करीत मूलभूत सोयीसुविधांमध्ये वाढ करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, आयुक्त अजिज शेख, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, डॉ. महेश भडांगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, डॉ. विक्रम बांदल, डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, साक्री व शिरपूर तालुक्यातील काही गावांमध्ये बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच या गावांमधील बाधित रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होत आहेत.

त्यामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून अशा गावांमध्ये पोहोचावे. या पथकांना ग्रामस्तरीय समित्या सहकार्य करतील.

तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन आणि निमा या वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांनी सहकार्य करावे. यामुळे करोनाबाधित रुग्णांवर पहिल्या टप्प्यात उपचार करणे शक्य होईल. या मोहिमेचे उपविभागीय अधिकारी सनियंत्रण करतील.

आरोग्य यंत्रणांनी अतिदक्षता विभागातील खाटांसह ऑक्सिजनयुक्त खाटांची संख्या वाढविण्याबरोबरच मूलभूत सोयीसुविधा वाढवाव्यात. औद्योगिक वसाहतीत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा.

त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाठपुरावा करावा. तसेच रुग्णालयांनी ऑक्सिजन निर्मिती करून स्वयंपूर्ण होण्यावर भर द्यावा. ऑक्सिजन अधिकार्‍यांनी किमान 24 तास पुरवठा होईल, असे नियोजन करावे. त्यासाठी रुग्णालयांच्या नियमितपणे संपर्कात राहावे, असेही त्यांनी सांगितले.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखतानाच औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरळीतपणे सुरू राहावेत म्हणून आरोग्य विभागाने अवधान व नरडाणा येथील औद्योगिक वसाहतीतील कामगारांची नियमितपणे रॅपिड अँटिजेन चाचणी करावी.

याशिवाय अत्यावश्यक सेवेतील दुकानदार, त्यांच्याकडील कामगार, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, फेरीवाल्यांची नियमितपणे रॅपिड अँटिजेन चाचणी करावी. याशिवाय धुळे व शिंदखेडा तालुक्यात आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजेन चाचण्यांची संख्या वाढवावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिल्या.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com