मोहन मराठे मृत्यूप्रकरणातील संशयित एपीआय राठोड यांचा करोनाने मृत्यू

मोहन मराठे मृत्यूप्रकरणातील संशयित एपीआय राठोड यांचा करोनाने मृत्यू

धुळे - DHule - प्रतिनिधी :

दोंडाईचा येथील बहुचर्चीत मोहन मराठे मृत्यू प्रकरणातील संशयित सहाय्यक पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड यांचा आज कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण, उल्हासनगर येथे खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

दोंडाईचातील संत कबीरदासनगरातील रहिवासी असलेले मयत मोहन सदाशिव मराठे यास दोंडाईचा पोलिसांनी तांदूळ चोरी प्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. मात्र नंतर शहादा रोडवरील पीरबल्लीजवळ रस्त्यावर त्याचा मृतदेह आढळून आला होता.

दरम्यान मोहन मराठेचा मृत्यू संशयास्पद असल्याने सीआयडी चौकशी करण्यात आली. सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक रविकिरण दरवडे यांनी सखोल तपास केला.

त्यात तत्कालीन पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्यासह पोकाँ वासुदेव जगदाळे, सीताराम दामू निकम, राहुल सोनवणे यांच्यावर आरोप ठेवून चौघांवर दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी तिघा कर्मचार्‍यांना अटक केली होती. तर सपोनि राठोड हे फरार होते. मध्यंतरी न्यायालयाने राठोड यांचा अटकपुर्व जामीन मंजूर केला होता. त्यामुळे ते कल्याण येथे कुटूंबासोबत वास्तव्यास होते.

नुकतीच त्याची प्रकृती बिघडली. गेल्या मंगळवारपासून त्यांच्यावर उल्हासनगर येथे एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र काल त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना कल्याण येथे खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले होते.

आज पहाटे त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान सपोनि पंजाबराव राठोड यांनी जिल्ह्यात पिंपळनेरसह स्थानिक गुन्हे शाखेतही सेवा बजावली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com