धुळे : लॉकडाऊन

पोलीस प्रशासनाने रस्त्यावर उतरुन नियमांच्या अंमलबजावणीवर दिला भर
धुळे : लॉकडाऊन

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

करोनाची दुसरी लाट परतवून लावण्यासाठी महाराष्ट्रात 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून 1 मे च्या पहाटे सहावाजेपर्यंत शासनाने लॉकडाऊन केले आहे.

मात्र या कालावधीत खाद्य पदार्थ, वैद्यकीय सेवेसह जीवनावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. आज पहिल्याच दिवशी धुळ्यात पोलीस प्रशासनाने रस्त्यावर उतरुन नियमांच्या अंमलबजावणीवर भर दिला.

बाजारपेठेत कडकडीत बंद आढळून आला तर काही ठिकाणी यातून पळवाटा शोधण्याचाही प्रयत्न झाल्याचे दिसले. याशिवाय विनाकारण बाहेर फिरणार्‍यांवर कारवाई करण्यात आली.

आग्रा रोडवर शुकशुकाट

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जुना आग्रा रोडवर आज सकाळपासूनच शुकशुकाट जाणवला. व्यापार्‍यांनी आपापली दुकाने बंद ठेवून या लॉकडाऊनमध्ये सहभाग नोंदविला. ऐरव्ही गजबजलेला हा परिसर निर्मनुष्य झाल्याने सगळीकडेच सामसुम आढळून आले.

तसेच उन्हाची तीव्रता वाढल्याने यात आणखीच भर पडून आग्रा रोडवरील हे असे दृष्य अशा अपवादात्मक परिस्थितीतच जाणवते. यावेळी फरक मात्र असा की, व्यापार्‍यांनी उर्त्स्फुतपणे लॉकडाऊनमध्ये सहभाग घेवून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पाऊल पुढे टाकले आहे.

फळ विक्रेत्यांनी केली गर्दी

शासनाने 15 दिवसांच्या या लॉकडाऊनमध्ये जीवनाश्यक वस्तुंना मुभा दिली असून यात भाजीपाल्याचा समावेश असून याचा फायदा घेवून बाजारपेठेत फळ विक्रेत्यांनी चांगलीच गर्दी केल्याचे आढळून आहे.

यामुळे लॉकडाऊनच्या नियमांना फाटा दिला जात असल्याचे बघून पोलीस प्रशासनाने रस्त्यावर उतरुन फळ विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्यास सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे, शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक नितीन देशमुख यांनी बाजारपेठेत फेरफटका मारला.

बाजार समितीत माल पडून

कृषी उत्पन्न बाजार समितीच आवारात रोज पहाटे भरणारा भाजी बाजार आज नेहमीप्रमाणे वर्दळीचा जाणवला नाही. ठिक ठिकाणी भाजी विकणार्‍या विक्रेत्यांनी मोजकीच गर्दी आढळून आली. यामुळे नेहमीप्रमाणे जास्तीचा भाजीमाल आणणार्‍या व्यापार्‍यांचा माल पडून असल्याचे दिसले.

बाजार समितीनेही अन्य व्यवसायास मज्जाव केल्याने सध्या बाजार समितीच्या आवाहरातील गर्दी ओसरली आहे. लॉकडाऊनच्या परिणामाने मोठे आर्थिक नुकसान होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यापारी आणि विक्रेत्यांनी व्यक्त केल्या असून परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे.

फिरणार्‍यांची कसून चौकशी

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लागु केलेल्या 15 दिवसांच्या लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनही या दृष्टीने सतर्क असून आज रस्त्यावर फिरणार्‍या दुचाकी, चारचाकी वाहनांना अडवून वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी कसुन चौकशी केली.

घराबाहेर पडण्याचे कारण गरजेचे नसेल तर काही जणांवर कारवाईचा बडगाही उगारला. मात्र अद्यापही नागरिकांनी याबाबत गांभीर्य बाळगण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com