धुळे - Dhule - प्रतिनिधी :

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात 30 एप्रिल पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

या कालावधीत सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी 7 ते रात्री 8 वाजेच्या दरम्यान पाच पेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येवून गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

30 एप्रिल 2021 पर्यंत शुक्रवारी रात्री 8 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास मनाई राहील.

या निर्बंधातून मेडिकल व इतर अनुषंगिक अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारे घटक, कंपनीत जाणारे व येणारे कामगारांना सूट राहील. मात्र, संबंधितांनी ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

याशिवाय हॉस्पिटल, रोगनिदान सेंटर्स, क्लिनिक, मेडिकल इन्शुरन्स कार्यालये, औषध विक्रेते व कंपन्या, इतर वैद्यकीय सेवेशी संबंधित घटक, किराणा दुकाने, भाज्यांची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, फळ दुकाने (सर्व आठवडे बाजार बंद राहतील), रेल्वे, टॅक्सी, ऑटो व सार्वजनिक बससेवा, मान्सून पूर्व कामे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, माल वाहतूक, कृषीशी संबंधित सेवा, ई- कॉमर्स, मान्यताप्राप्त मीडिया, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घोषित करण्यात येणार्या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

सर्व मनोरंजन पार्क, बगीचे, नाट्ययगृहे, प्रेक्षकगृहे, सार्वजनिक ठिकाणे बंदच राहतील. शॉप, मार्केट व मॉल्स बंद राहतील. अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने हे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन सुरू राहतील.

अत्यावश्यक सेवा देणारे दुकान मालक व दुकानातील कर्मचार्यांनी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कोविड लसीकरण करुन घ्यावे. असे आवाहन प्रशासनाने केली आहे.

सार्वजनिक वाहतूकीद्वारे प्रवास करणार्या सर्व प्रवाशांना चेहर्यावर मास्क लावणे बंधनकारक राहील. उल्लंघन करणार्या व्यक्तींवर 500 रूपयेे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

10 एप्रिल पासून चालक व कर्मचार्यांनी 15 दिवसांची वैधता असलेले कोविड-19 निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील. चालक व कर्मचार्यांनी लसीकरण करुन न घेतल्यास व कोविड-19 निगेटिव्ह अहवाल सोबत न बाळगल्यास एक हजार रुपयांचा दंड करण्यात येईल.

लग्न व इतर समारंभ हे केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत कोविड नियमावलींचे पालन करुन साजरे करावेत. लग्न समारंभास येणार्या प्रत्येक व्यक्तीने लसीकरण करुन घ्यावे.

लसीकरण करुन न घेतलेल्या व्यक्तींनी कोविड चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील. या आदेशाचे उल्लंघन करणार्या व्यक्तीस एक हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात येईल, तर आस्थापनेवर दहा हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येईल.

या आदेशाचे वारंवार उल्लंघन केल्यास सदरची जागा सील करण्यात येईल. अंत्यविधी कार्यक्रमासाठी केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहता येईल. अंत्यविधीस येणार्या प्रत्येक व्यक्तीने लसीकरण केलेले असावे.

लसीकरण करुन न घेतलेल्या व्यक्तींनी कोविड चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील. उघड्यावर कोणासही खाद्यपदार्थांची व्रिकी करता येणार नाही. असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले.