भाडणे कोविड केअर सेंटरला आवश्यक सुविधा पुरवाव्यात

भाडणे कोविड केअर सेंटरला आवश्यक सुविधा पुरवाव्यात

जिल्हाधिकारी संजय यादव, साक्री येथे आढावा बैठक

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

साक्री तालुक्यात कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्ण संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भाडणे येथील कोविड केअर सेंटरला आवश्यक सोयी सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली.

या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी चारही तालुक्यांचा आढावा घेण्यासाठी दौरा करण्यात येईल, असे सांगितले. त्यानुसार जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी आज सकाळी साक्री तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आ.मंजुळाताई गावित, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती मंगलताई पाटील, साक्री पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, पोलिस उपअधीक्षक प्रदीप मैराळे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असून लोकसहभाग महत्वाचा आहे.

नागरिकांनी राज्य शासनाच्या नियमांचे पालन केल्यास या रोगाला अटकाव बसू शकतो. अधिकारी व कर्मचार्‍यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्यासाठी प्रवृत्त करावे. त्यासाठी गावागावांत जनजागृती करावी. विना मास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी.

ऑक्सिजनयुक्त खाटांची उपलब्धता करावी, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी भाडणे येथील कोविड केअर सेंटरला भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांना तेथे दाखल रुग्णांशी संवाद साधला.

गर्दी आढळल्यास अधिकार्‍यांवर कारवाई

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड अँटिजेन चाचणी करावी. माझे कुटुंब- माझी जबाबदारी मोहिमेच्या धर्तीवर सर्वेक्षण मोहीम राबवावी.

करोनाची लक्षणे आढळून येणार्‍यांची रॅपिड अँटिजेन चाचणी करावी. मर्यादेपेक्षा गर्दी आढळल्यास पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवकावर कारवाई केली जाईल.

मंगल कार्यालयांनी विवाह सोहळ्यांची यादी तहसील कार्यालयास द्यावी. तहसील कार्यालयाचे पथक विवाहाच्या दिवशी करणार पाहणी.

सीमा तपासणी नाक्यावर होणार प्रवाशांची तपासणी. साक्री येथे तातडीने 20 बेड ऑक्सिजनयुक्त करावेत.

दोन खासगी कोविड केअर सेंटरचे प्रस्ताव सादर करावेत. लसीकरण दोन सत्रात राबवीत केंद्रांची संख्या वाढवावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com