धुळे : जिल्हाधिकारी पोहोचले शेतकर्‍यांच्या बांधावर

शिंदखेडा तालुक्यातील शेतकर्‍यांची कृषी संजीवनी सप्ताहनिमित्त शेतकर्‍यांशी साधला संवाद
धुळे : जिल्हाधिकारी पोहोचले शेतकर्‍यांच्या बांधावर

धुळे - Dhule - Shindkheda

कोरोना विषाणूबाधित रुग्णांच्या अडचणी समजून घेण्यासाठी पीपीई कीट घालत जिल्हा रुग्णालय व श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील अलगीकरण कक्षात जावून रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेणारे जिल्हाधिकारी संजय यादव आज थेट शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचले. एवढेच नव्हे, तर त्यांनी ट्रॅक्टरवर बसून रोटाव्हेटर चालविले. निमित्त होते, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजर्‍या होणार्‍या कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपाचे.

कृषी विभागातर्फे एक ते सात जुलै 2020 या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा आज समारोप झाला. यानिमित्त जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी शिंदखेडा तालुक्यातील बाभळे, डाबली या भागात जावून तेथील शेतकर्‍यांच्या शेतात पोहोचले. त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी विज्ञान केंद्र, धुळेचे प्रमुख डॉ. दिनेश नांद्रे, प्रा. डॉ. जगदीश काथेपुरी, तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे, मंडळ कृषी अधिकारी एन. एन. साबळे, बी. डी. देसले, लालन राजपूत, कृषी सहाय्यक कांतिलाल साळुंखे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी आदिवासी शेतकरी बांधवाच्या शेताला भेट दिली. त्यांनी कापूस पीक पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन अंतर्गत कामगंध सापळे, बोंड अळी नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com