अनिल गोटेंच्या गर्भीत इशार्‍यात दडलंय काय ?

अनिल गोटेंच्या गर्भीत इशार्‍यात दडलंय काय ?
Anil Gote

सध्या सर्वदूर कोरोनाचा धुमाकुळ सुरु असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणाला परस्परांवर चिखलफेक करण्यासाठी कुठलेही निमित्त कारणीभूत ठरते. सध्या भाजपचे विधानपरिषदेच्या माध्यमातून नुकतेच आमदार झालेले गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने राजकारण तापते आहे. राज्यभर पडळकरांचा निषेध, त्यांच्या प्रतिमेचे दहन होते आहे. एकीकडे पडळकरांच्या प्रतिमेला शेणाचा मारा होत असतांना आता त्यांच्या समर्थनार्थ काही जण रस्त्यावर उतरले असून ते पडळकरांच्या प्रतिमेला दूधाचा अभिषेक घालत आहेत. याच विषयाला धरून धनगर विरुध्द मराठा असा वादही पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याकडे पडद्यामागून उचकविणारे कधीच समोर येत नाही, अन् रस्त्यावर येवून आंदोलने करीत स्वतःवर गुन्हे दाखल करुन घेणारे मोठे नेते होत नाही. नेता आणि कार्यकर्त्यांमधील ही दरी वर्षोनवर्षे अशीच आहे. किंबहूना ही दरी कायम रहावी यावरच काही नेत्यांची दुकाने सुरु आहे.

आपला मुद्दा राज्याच्या राजकारणाशी निगडीत नाही. राज्याच्या राजकारणावर आपल्याला भाष्यही करायचे नाही. पण आ.पडळकरांच्या निमित्ताने धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या तिखट वक्तव्याचा अर्थ लावण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. पडळकरांना सोडून श्री.गोटे यांनी फडणवीसांवर निशाणा का साधला असावा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होणे स्वाभाविक आहे. विशेष म्हणजे यावेळी श्री.फडणवीस एकही शब्द बोललेले नसतांना गोटे यांनी काढलेले पत्रक किंवा प्रसार माध्यमांसमोर केलेले वक्तव्य यात जुन्याच वादाचा, जखमांचा हा परिणाम असून यानिमित्ताने का होईना फडणवीसांबद्दल अनेक दिवसांपासून असलेला राग, संताप व्यक्त करण्याची संधी गोटे यांनी साधली असावी असेच वाटते आहे.

गोटेंच्या दृष्टीने आ.पडळकर हे अगदीच नवखे आहेत. त्यांना राजकारणाचा फारसा अनुभव नाही. किंवा अद्याप पडळकरांना भाजपही नीट कळलेला नाही. असे असतांना थेट पवारांबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याचा गोटेंनी ठरविले तर अत्यंत खालच्या भाषेत समाचार घेतला असता. पण आ.पडळकर हे धनगरांच्या आरक्षणाबद्दल बोलले असून गोटे हे धनगरांचे नेते आहेत. त्यामुळे पडळकरांच्या वक्तव्याचे समर्थन केले तर पवारांच्या विरोधात भूमिका जाईल अन् पडळकरांना ठासून विरोध केला तर समाज विरोधी भूमिका दिसेल, अशा द्विधा भूमिकेत गोटे अडकले असावेत. त्यामुळेच त्यांनी फडणवीसांवर निशाना साधण्याचा मधला मार्ग शोधला असावा, असे तर नाही.

काय म्हणालेत, गोटे

फडणवीस विरुध्द गोटे हा वाद धुळे महानगरपालिका निवडणुकीपासूनच धुमसतो आहे. आता ‘कोरोना विरुध्द महारोग, व्हाया पडळकर’ यानिमित्ताने तो पुन्हा उफाळून आला आहे. राज्याचे विरोधीपक्षनेते फडणवीस हे विश्वासघातकी, कप्पी व्यक्तीमत्व असून बहुजन नेतृत्व संपविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, भाजपातील मनुवादीवृत्ती याचा आपण स्वतः बळी असल्याचे अनिल गोटे यांनी थेट प्रसार माध्यमांसमोर सांगितले. हे सांगतांना त्यांनी गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, एकनाथराव खडसे यांचाही उल्लेख केला. मोठा जनाधार असलेले आणि बहुजन चेहरा असलेले नेते भाजपने कसे संपविले, बाजूला ठेवले हेच यातून गोटे यांना म्हणावयाचे आहे, ते त्यांनी स्पष्टपणे मांडले. निशाणा मात्र फडणवीस यांच्यावर साधला. राजकारणात असे आरोप-प्रत्यारोप होत असतात. पक्षाने दिले तर चांगले अन्यथा अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होते, हे सगळ्याच पक्षांना लागू आहे. गोटेही यास अपवाद नाहीत. परंतु मुद्दा एव्हढ्यापुरता सिमीत नसून ‘फडणवीस यांच्याबद्दल आपण आणखी सविस्तर बोललो किंवा लिहिले तर लोक त्यांना रस्त्यावर धरुन मारतील’ हे गोटे यांचे वक्तव्य गंभीर आहे. एका राष्ट्रीय पक्षाच्या जबाबदार नेत्याबद्दल केलेल्या या वक्तव्याला राजकीय दृष्ट्या अर्थप्राप्त होतो. गोटे यांचा हा गर्भीत इशारा म्हटले तर खूप काही सांगून जातो. असे बेधडक विधान करण्यामागे नेमके कारण काय असावे? असा प्रश्न यातून उपस्थित होणे स्वाभाविक आहे.श्री. गोटे यांचा राजकीय प्रवास संघर्षाचा असला तरी ते त्यांच्या बेधडक वक्तव्य आणि आक्रमक स्वभावामुळे सर्वदूर परिचित आहेत. त्याचप्रमाणे भूमिका बदलविण्यात आणि आपण घेतलेली भूमिकाच खरी, हे पटवून देण्यात देखील ते माहीर आहेत.

तेव्हा कौतुक आता टिका

माजी आ.अनिल गोटे यांच्या दूरदृष्टीतून पांझरा नदी काठी दोन्ही बाजूला प्रत्येकी साडेपाच कि.मी.चे रस्ते तयार होत आहेत. या रस्त्यांसह इतर कामांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 75 कोटी रुपयांचा भरीव निधी दिला. याबद्दल श्री.गोटे यांनी त्यावेळी त्यांचे भरभरून कौतुक केले. आपल्याला मंत्रीपद नको पण धुळेकरांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी विकास कामांना निधी हवा आणि फडणवीसांनी तो दिला, असे त्यावेळी गोटे म्हणत असत. पांझरा नदी पात्रात झालेल्या जाहीर सभेला फडणवीस यांनीही हजरी लावून एका अर्थाने गोटेंशी असलेल्या मैत्रीवर शिक्कामोर्तब केला होता. अर्थात या दोघा नेत्यांमध्ये खरोखरच चांगले, मैत्रीपूर्ण संबंध होते. गोटेंच्या ज्ञानाचा पक्षाने उपयोग करुन घ्यायला हवा, असे फडणवीस देखील म्हणत असेत. मग नेमकी माशी शिंकली कुठे? या दोघांमध्ये कोणी मिठाचा खडा टाकला? त्यावेळेचे कौतुकपात्र नेतृत्व आज नीच, कपटी, विश्वासघातकी का बनले? यामागे मोठे राजकारण आहे. धुळे महापालिका निवडणुकीपासून पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. गोटेंच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक लढण्याचे संकेत असतांना तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे किंवा गोटेंच्या स्थानिक विरोधकांमध्ये निर्माण झालेले वाद सार्‍यांना ठाऊक आहेत. धुळे शहराच्या स्थानिक राजकारणात गोटे विरुध्द बाकी सारे, असेच चित्र कायम राहिले. भाजपात म्हणजे एकाच पक्षात असतांनाही हेच चित्र होते. त्यामुळे आमदारकीचा आणि पाठोपाठ पक्षाचा राजीनामा देवून स्वतंत्र चूल मांडणार्‍या गोटेंनी विधानसभेनंतर राष्ट्रवादी काँग्रसमध्ये प्रवेश केला. आता ते या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धुळे, नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

गोटेंच्या दृष्टीने एकमात्र बरे की, त्यावेळी राष्ट्रवादीत असलेले त्यांचे सर्व विरोधक आज भाजपात आहेत. त्यामुळे काही जुन्या निष्ठावंत सहकार्‍यांना घेवून राष्ट्रवादीचा नवा गोतावळा निर्माण करायचा आहे. याच अनिल गोटे यांनी एकेकाळी शरदचंद्र पवार यांना लक्ष्य करुन त्यांच्यावर टोकाचे आरोप केलेत. राज्यातील काही प्रमुख महानगरांमध्ये पवारांविरुध्द पत्रकार परिषदाही घेतल्या तेही बेधडक. मात्र मागचे हे सारे विसरुन शरद पवार यांनी गोटेंवर विश्वास दाखवित त्यांना पक्षात सन्मानाचे स्थान दिले. त्यामुळे नव्या घरोब्यात गोटेंची पवार निष्ठा असणे स्वाभाविकच आहे. यामुळे पवारांबद्दल अपशब्द वापरणार्‍या आ.पडळकरांचा त्यांनी समाचार घेणे देखील स्वाभाविक आहे. हे करीत असतांना गोटे यांनी आपल्या स्वभावानूसार फडणवीसांनाही अंगावर घेतले. एकाचवेळी अनेकांना अंगावर घेवून संघर्ष करण्याची त्यांची जुनीच सवय आहे. त्यामुळे गोटेंच्या आक्रमक वक्तव्यांबद्दल आश्चर्य असे काहीच नाही. पण मुद्दा त्यांनी ‘मिस्टर क्लिन’ म्हणविणार्‍या फडणवीसांना दिलेल्या गर्भीत इशार्‍याचा आहे. पक्षातील काही गुपीते गोटेंकडे आहे की, भाजपची बहुजन समाज विरुध्द भूमिकेचे काही पुरावे आहेत? नेमके काय? कदाचीत फडणीवसांच्या समर्थनार्थ उतरतायं कोण? याची गोटेंनाही प्रतिक्षा असावी.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com