कंटेनरने दुचाकींना उडविले, युवक ठार

दोन जखमी : सोनगीर शिवारात घटना, चालकावर गुन्हा
कंटेनरने दुचाकींना उडविले, युवक ठार

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर पोलिस ठाण्यासमोर भरधाव कंटेनरने दुचाकींना दिलेल्या धडकेत एक युवक ठार झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.

काल पहाटे हा अपघात झाला. याप्रकरणी कंटेनर चालकावर सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित दिलीप पाटोळे (वय 18 रा. शिंदखेडा) असे मयत युवकाचे नाव आहे. तर राकेश राजेंद्र अहिरे (वय 26 रा. प्लॉट नं. 69, उत्कर्ष कॉलनी, साक्री रोड, धुळे) व गौरव अनिल गायकवाड (वय 18 रा. शिंदखेडा) हे जखमी झाले.

रोहित व राकेश हे दोघे काल पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास दुचाकीने (क्र. एमएच 18 बीटी 9567) जात होते.

त्यादरम्यान त्याना सोनगीर पोलिस ठाण्यासमोरच मागून भरधाव वेगाने येणार्‍या कंटेनरने (क्र. आरजे 40 जीए 2294) जोरदार धडक दिली. त्यात रोहित हा ठार झाला. तर मागे बसलेला राकेश जखमी झाला.

तसेच त्यांच्या सोबत चालणारा दुचाकीचालक (क्र. एमएच 18 एटी 9887) गौरव हा देखील जखमी झाला. तसेच दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले. याबाबत राकेश अहिरे याने सोनगीर पोलिात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोना चव्हाण करीत आहेत.

मुकटीनजीक तरूण ठार

धुळे तालुक्यातील मुकटी शिवारात झालेल्या अपघातात तरूण ठार महेश प्रकाश सनेर (वय 28 रा. तासपुरी ता.शिरपूर व ह.मु संकल्प कॉलनी, देवपूर, धुळे) असे मृत तरूणाचे नाव आहे.

तो काल दि. 2 रोजी सकाळी प्रियंका प्रकाश सनेर यांच्यासह दुचाकीने (क्र. एमएच 18, बी एन 4688) पारोळ्याकडून धुळे शहराकडे येत होता. मुकटी शिवारात भरधाव ट्रकने (क्र. एमएच 18, एए 0506) त्यांना धडक दिली.

त्यात महेश हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर प्रियंका सनेर या जखमी झाल्या. याप्रकरणी अनिल आनंदा सनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com